विजय मानकर
सालेकसा : नियतीचा खेळ बराच अजब असतो, कधी कुणावर कोणते संकट ओढवेल हे सांगता येत नाही. आई-वडिलांचे बोट पकडून हसण्या बागडण्याच्या दिवसात जर आई-वडिलांचा आधार हिरावला जात असेल तर त्या चिमुकल्यांची काय अवस्था होत असेल, याचा विचार न केलेलाच बरा, पण अशीच वेळ तालुक्यातील अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या डोमाटोला येथील बावणे कुटुंबातील दोन बहिणींवर आली आहे.
तालुक्यातील दक्षिण - पूर्व दिशेत छत्तीसगड राज्याच्या सीमेलगत असलेला डोमाटोला गावाचा परिसर अतिदुर्गम, डोंगराळ व अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त आहे. जंगली भाग असल्याने या भागात दरवर्षी हिवतापाचा प्रकोप वाढतो. नक्षलग्रस्त भाग असल्याने प्रशासन आणि सोयी सुविधा वेळेवर कधीच पोहोचत नाहीत. परिणामी अनेक रुग्णांचा उपचाराविनाच मृत्यू होतो. पावसाळ्यात हिवताप, सर्पदंश, विंचूदंश यांसारख्या घटना घडतात. डोमाटोला येथील संतोषी ब्रिजलाल बावने या ४५ वर्षीय महिलेला हिवतापाची लागण झाली. तिला वेळेवर औषधोपचार मिळाला नाही. हिवतापाचा संसर्ग मेंदू ज्वरापर्यंत पोहोचला. यातच तिचा मृत्यू झाला. त्यामुळे दोन चिमुकल्या बहिणींवर अनाथ होण्याची वेळ आली. एक वर्षापूर्वीच वडील ब्रिजलाल बावणे यांचे मेंदूज्वराने निधन झाले. वडिलांपाठोपाठ महिनाभरातच आईचा मृत्यू झाल्याने अकरा वर्षांची दीक्षा आणि दुसरी सात वर्षाची आरोही यांचा आधारवड हिरावला आहे. मोठी मुलगी पाचवीत, तर लहान मुलगी दुसरीत शिकत आहे. आई मोलमजुरीची कामे करून दोन्ही मुलींना शिकवित होती, कुटुंबाचा गाडा पुढे नेत होती. मात्र, आता नियतीने आईचेसुध्दा छत्र हिरावून घेतल्याने या दोन्ही बहिणी पोरक्या झाल्या आहेत.
.......
मायेचा हात आणि शिक्षणाची साथ हवी
आई - वडिलांचे छत्र हिरावल्याने दोन्ही बहिणी लहान वयातच अनाथ झाल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या संगोपनाची जबाबदारी घेत त्यांना मायेचा आधार आणि आर्थिक बळ देण्याची गरज आहे. मुलींचे मामा सीमेपलीकडील छत्तीसगड राज्यात असून, त्यांच्या मामाने बहिणीच्या मृत्यूनंतर त्या दोन्ही चिमुकऱ्यांना आपल्या घरी आसरा दिला आहे. मामाचे कुटुंब त्यांना केव्हापर्यंत स्वीकार करेल, हे सांगता येत नाही. त्यामुळे त्या अनाथ बहिणींना मायेचा हात आणि शिक्षणाची साथ या दोन्ही गोष्टींची गरज आहे.
बॉक्स
नेशन फर्स्ट ग्रुपने दिला मदतीचा हात
जिल्हाधिकारी राजेश खवले यांच्या प्रेरणेने मदतीसाठी सदैव तत्पर राहणारा नेशन फर्स्ट इन कोविड या फाऊंडेशनने त्या अनाथ मुलींची भेट घेतली व त्यांना जीवनाश्यक वस्तू भेट दिल्या. जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनावरून जिल्ह्यातील काही तलाठी, पोलीस आणि प्राथमिक शिक्षकांच्या मनात पाझर फुटले आणि दहा लोकांनी ५०० रुपये प्रतिमहिनाप्रमाणे दर महिन्याला एकूण पाच हजार मदत करण्याचा संकल्प केला आहे. ही मदत त्या दोन बहिणींना सतत एक वर्ष मिळत राहील.