अर्जुनी-मोरगाव : तालुक्यातील ग्राम बोरटोला येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक डी.एम. लोणारे व खडकी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक डी.व्ही. गोबाडे यांना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सी.एल. पुलकुंडवार यांनी ६ आॅक्टोबर रोजी निलंबित केले आहे.निलंबित शिक्षकांवर अनाधिकृतपणे गैरहजर राहणे, शैक्षणिक कार्य सुरळीत पार न पाडणे, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान, वरिष्ठांच्या आदेशाची अवहेलना करणे, पदाच्या कर्तव्याचा भंग करणे यामुळे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राची अंमलबजावणी प्रभावीपणे होऊ शकत नाही. या कारणावरुन महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम ३९६७ मधील ३ अन्वये आपले कर्तव्य बजावित असताना नियमाचा भंग केल्यामुळे शिस्तभंगाची कारवाई प्रस्थापित केली आहे.दोन्ही शिक्षकांविरुद्ध महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (शिक्षा व अपीली नियम १९६४ चे नियम ३ मधील तरतुदीनुसार तात्काळ प्रभावाने निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यांना निलंबन काळात पंचायत समिती सालेकसा हे मुख्यालय देण्यात आले आहे. पंचायत समितीचे सभापती अरविंद शिवणकर यांनी शालेय वेळात कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध राबविलेल्या कडक मोहिमेमुळे कामचुकार कर्मचाऱ्यांमध्ये धडकी भरली आहे. त्यांच्या या कृतीचे सर्वत्र स्वागत केले जात आहे. तालुक्यातील आणखी काही कर्मचारी कारवाईच्या वाटेवर असल्याचे बोलल्या जात आहे. (तालुका प्रतिनिधी)
दोन शिक्षक निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2016 12:39 AM