नरेश रहिले गोंदिया: मूर्रीच्या साई पेट्रोल पंप येथील मजूर राहुल राजकुमार गोंडाणे (३२) रा. संजयनगर गोविंदपुर गोंदिया यांना १३ जुलै रोजी दुपारी ३ वाजता मारहाण करणाऱ्या आरोपी कुणाल विनोद धकाते (२५) रा. चंद्रशेखर वार्ड, श्रीनगर गोंदिया व आनंद ऊर्फ लालबाल राजेश नागपुरे (२७) रा. दांडेगाव ता. जि गोंदिया या दोघांना गोंदिया शहर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याजवळून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त केली.
या आरोपींनी पेट्रोल भरल्यावर आपसात वाद केला. येथे भांडण करू नका असे राहूल म्हणाला असता त्याला आरोपींनी मारहाण करून पेट्रोलपंपच्या ड्रॉव्हर मधून १२ हजार ३०० रूपये जबरीने हिसकावून नेले होते. यासंदर्भात गोंदिया शहर पोलिसात भारतीय न्याय संहिता कलम कलम ३०९ (६) अन्वये गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा, उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी बानकर, पोलीस निरीक्षक किशोर पर्वते यांच्या मार्गदर्शनात करण्यात आला. या प्रकरणात दोन्ही आरोपींकडून ६ हजार ४०० रूपये रोख व गुन्हयात वापरलेली मोटार सायकल किंमत ४० हजार असा एकुण ४६ हजार ४००/- रुपयाचा माल हस्तगत करण्यात आला. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गराड करीत आहेत.
ही कारवाई गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गराड, पोलीस हवालदार कवलपालसिंग भाटीया, जागेश्वर उईके, सुदेश टेंभरे, दिपक रहांगडाले, सतिश शेंडे, प्रमोद चव्हाण, निशीकांत लोंदासे, पोलीस शिपाई अशोक रहांगडाले, दिनेश बिसेन, मुकेश रावते, सुभाष सोनवाने, सनोज सपाटे यांनी केली आहे.