गोंदिया : घाटातून रेतीचे अवैधरित्या अवैधरित्या खनन करून चोरटी वाहतूक करणारे दोन वाहन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कोहमारा ते देवरीकडे जाणाऱ्या महामार्गावरील शशिकरण पहाडी घाट परिसरात धाड टाकून पकडले. गुरूवारी (दि.२०) ही कारवाई करण्यात आली असून यामध्ये पथकाने वाहन व रेती असा ३५ लाख ३५ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.
डुग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत चुलबंद नदीच्या पात्रात काही लोक अवैधरित्या रेतीचे खनन करून चोरटी वाहतूक करीत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. माहितीच्या आधारे पथकाने गुरुवारी (दि.२०) रेतीची अवैध वाहतूक करीत असलेल्या १० चाकी अशोक लेलँड कंपनीचा हायवा वाहन व सहा चाकी टिप्परला कोहमारा ते देवरीकडे जाणाऱ्या महामार्गावरील शशिकरण पहाडी घाट परिसरात धाड टाकून रंगेहाथ पकडले. तसेच दोन्ही वाहन व त्यात सात ब्रास रेती असा एकूण ३५ लाख ३५ हजार रूपयांचा माल जप्त केला.
या प्रकरणी वाहन चालक-मालक महेश शंकर डुंबरे (४०,रा. वाॅर्ड क्रमांक-३, कोहमारा) व विशाल बाबुलाल रहिले (२५, रा. भरेगाव, देवरी) यांच्याविरुद्ध अवैध रित्या रेतीचे खनन करून स्वतःचे आर्थिक फायद्याकरीता शासनाचा महसूल बुडवून रेतीची चोरी प्रकरणी डूग्गीपार पोलीस ठाण्यात भादंवी कलम ३७९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीतांना अटक करण्यात आली असून डुग्गीपार पोलिसांचे स्वाधीन करण्यात आले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश लबडे, यांच्या मार्गदर्शनात पो.उप. नि. महेश विघ्ने, सहा.फौज. अर्जुन कावळे, पो. हवा. भूवनलाल देशमुख, इंद्रजित बिसेन, पोशी संतोष केदार, चा.पो.हवा.लक्ष्मण बंजार यांनी केलेली आहे.