सडक अर्जुनी (गोंदिया) : महामार्ग पोलिस केंद्र डोंगरगावच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी गस्तीदरम्यान दुर्मीळ सारस पक्ष्यांची तस्करी करणारी दोन वाहने पकडली. तसेच पाच जणांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. १२) बाह्मणी येथे केली. पाच सारस प्रजाती पक्षी (क्रॉमन क्रेन) ताब्यात घेऊन पोलिसांनी तस्करांना पुढील कार्यवाहीसाठी वनविभागाच्या ताब्यात दिले आहे.
महामार्ग पोलिस केंद्र डोंगरगावचे पोलिस उपनिरीक्षक दिनेशकुमार लिल्हारे, पोलिस नायक बनोठे व शिपाई अली हे मंगळवारी (दि. १२) महामार्ग क्रमांक ५३ वर गस्तीवर (पेट्रोलिंग) होते. यावेळी बाह्मणी येथे दोन वाहने संशयास्पदरित्या आढळले. दरम्यान, वाहतूक पोलिसांनी जीजे ०५/ जेबी ७७३७ क्रमांकाचे टोयोटा इनोव्हा व जीजे ०५/ आरई ७४३० क्रमांकाच्या सुझुकी ब्रेझा या वाहनांची तपासणी केली. पहिल्या वाहनात दोन व्यक्ती व पाच मोठे पक्षी निदर्शनास आले. तर दुसऱ्या वाहनात तीन व्यक्ती होते. दोन्ही वाहनांतील पाच जणांची महामार्ग पोलिसांनी चौकशी केली. तसेच पक्ष्यांची बारकाईने पाहणी केली. यावेळी हे पक्षी दुर्मीळ कॉमन क्रेन (सारस प्रजाती) असल्याचे पाचही जणांनी सांगितले.
दरम्यान, पाच जिवंत असलेल्या दुर्मीळ कॉमन क्रेन पक्ष्यांसह पाचही जणांना महामार्ग पोलिसांनी ताब्यात घेतले. वनविभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी वाढई व त्यांच्या स्टाफला बोलावून या प्रकरणाची माहिती दिली. तसेच स्वयंसेवी संस्थेचे (सेवा) संचालक सावन बहेकार हेदेखील उपस्थित झाले. ही कारवाई महामार्ग पोलिस केंद्र डोंगरगावचे पोलिस उपनिरीक्षक जोकार, पोलिस उपनिरीक्षक लिल्हारे, पोलिस नायक बनोठे, पोलिस शिपाई अली, चचाणे, सहायक फौजदार भुते व पोलिस नायक नेरकर यांनी केली.
‘त्या’ पाच जणांना केले वन विभागाच्या स्वाधीन
पुढील कायदेशीर कारवाईकरिता दोन्हीही वाहने, पाच व्यक्ती व पाच दुर्मीळ कॉमन क्रेन पक्ष्यांना वनपरिक्षेत्राधिकारी गाढवे, राऊंड ऑफिसर वाढई व त्यांच्या ताब्यात देण्यात आले.
अशी आहेत ताब्यात घेतलेल्यांची नावे
समीर शाकीर मन्सुरी (वय २९), हजरूद्दीन गुलाब मोयुद्दीन मौलवी (वय २५, रा. सुरत, गुजरात), मुसा शेख (वय २४), शहजाद शेख (वय २९) व पठाण हुसेन गुलाब साबीर (वय १९, रा. भिंडीबाजार, सुरत, गुजरात) अशी ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची नावे आहेत.
तस्करी करणारे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता
महामार्ग पोलिसांनी गस्तीदरम्यान दोन वाहनातून दुर्मीळ विदेशी पक्ष्यांसह पाच जणांना ताब्यात घेतले आहे. या आरोपींना वन विभागाच्या स्वाधीन करण्यात आले आहे. त्यांची कसून चौकशी केली जाणार असून तस्करी करणाऱ्यांचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.