गोंदिया : दुचाकीला कट मारल्याच्या कारणावरून झालेल्या वादात तिघांनी एका तरुणाला धारदार शस्त्राने भोसकून ठार केल्याची घटना रेलटोली चौपाटी जवळील चाय-शाय बारसमोर ऐन दिवाळीच्या दिवशी रविवारी (दि.१२) रात्री ११:१५ वाजतादरम्यान घडली. अर्पित उर्फ बाबू ओमप्रकाश उके (२३, रा. आंबाटोली, गोंदिया) असे मृत तरूणाचे नाव आहे.
रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणारा रेलटोली परिसर नेहमीच गजबजलेला असतो. याच परिसरात गुजराती शाळेसमोरील चौपाटी जवळ मृत अर्पित उके हा त्याचा मित्र राहुल डहाट याच्यासोबत दुचाकीवरून जात असताना त्यांनी ट्रिपल सीट दुचाकीवरून जाणाऱ्या आरोपींना कट मारला. यावरून त्यांच्यात बाचाबाची सुरू झाली. वाद वाढल्याने ते मारहाणीवर आले व पाहता-पाहता चक्क तिघांनी अर्पित उके याच्यावर धारदार शस्त्राने वार केला. धारदार शस्त्र पोटात गेल्याने त्याचे आतडे कापल्या गेले. परिणामी रक्तस्त्राव होऊन अर्पितचा मृत्यू झाला. रामनगर पोलिसांनी अर्पितला उचलून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेल्यावर पाहताच डॉक्टरांनी मृत घोषीत केले.
या घटनेसंदर्भात राहुल राजू डहाट (२४, रा. दिनदयाल वाॅर्ड, रामनगर) याच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी तिघांवर भादंवि कलम ३०२, ३२४, ३२३, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक बस्तोडे करीत आहेत.सिनेस्टाईलने झाला खून
- अर्पित उके (२३) याच्या दोन्ही हातांना दोघा आरोपींनी ठेवले तर आज तेरेको जिंदा नही छोडेंगे असे म्हणत कुडवा येथील आरोपी हर्ष वाघमारे याने पॅन्टमध्ये खोचलेल्या चाकूने गळ्यावर पाेटावर मारून रक्तबंबाळ केले. त्यानंतर अर्पितला नालीत धक्का देऊन आरोपी पसार झाले.खून करणारे तिघेही गोंदियातीलच
- अर्पित उके याचा खून करणारे तिघे आरोपी गोंदियातीलच असून यामध्ये हर्ष धविंदर वाघमारे (रा. कुडवा), अंकज सोहनलाल राणे उर्फ राणा (रा. डब्लींग कॉलनी, माता मंदिर जवळ) व प्रविण सुनील मुटकुरे (रा. रेल्वे स्टेशन समाेर, रेलटोली) अशी आरोपींची नावे आहेत. ते तिघे फरार असून त्यांचा शोध रामनगर पोलिस घेत आहेत.