सालेकसा : शाळेतून घरी परत जात असताना दोन विद्यार्थ्यांच्या सायकलींना मागून मोटारसायकलने धडक दिल्यामुळे दोन्ही विद्यार्थी व बाईकस्वार जखमी झाले. हा अपघात कावराबांध ते गोवारीटोलादरम्यान असलेल्या वळणावर घडला. शाळेतून सुटी झाल्यानंतर झालिया येथे शिकत असलेले विद्यार्थी अनिल जियालाल सोनवाने (१४) रा. असईटोला (लटोरी) आणि हितेशकुमार काशीचंद ढेकवार (१४) रा. लटोरी हे दोघे आपआपल्या सायकलने घरी जात होते. ११.३० वाजताच्या सुमारास मोहाटोला फाट्याच्या वळणावर मागून आमगाव येथील दोन युवक भरधाव वेगाने मोटर सायकलने सालेकसाकडे जात होते. त्यांनी दोन्ही विद्यार्थ्यांच्या सायकलींना मागून धडक दिली. त्यामुळे दोघे विद्यार्थी रस्त्याच्या पलीकडे जाऊन पडले. यात एका विद्यार्थ्याच्या डोक्याला जबर मार लागला तर दुसरा विद्यार्थी किरकोळ जखमी झाला. परंतु त्याच बरोबर बाईकस्वार सुध्दा गंभीर जखमी झाला. दोघे मोटरसायकलस्वार हे आमगाव येथील रहिवासी असून अजयकुमार ग्यानीराम मारबदे (१६) आणि मोहन सालीकराम तरोणे (१७) असे त्यांची नावे आहे. ते दोघे मिळून एका मोटरसायकलवर वेगाने चालवित जात होते. त्यांच्या असंतुलित वेगामुळे इतर मुलीसुध्दा घाबरल्या आणि आपल्या सायकलीवरून खाली पडल्या अशी माहिती सोबत चालणाऱ्या विद्यार्थ्यांनी दिली. राज्य महामार्ग क्रमांक २४९ वर आमगाव सालेकसा दरम्यान दिवसरात्र चार व्यक्ती आणि दुचाकी वाहन सुसाट वेगाने चालत असतात. त्यामुळे झालिया कावराबांध परिसरात नेहमी अपघात होण्याचा क्रम सुरू असते.
दुचाकीची विद्यार्थ्यांना धडक
By admin | Published: August 18, 2014 11:34 PM