लोहारा (गोंदिया) : देवरी तालुक्यातील चिचगड अपर तहसील कार्यालय हद्दीतील घोनाडी गावाला लागून असलेल्या गाढवी नदीत नाव उलटून दोन मजूर महिलांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि.२८) सायंकाळच्या सुमारास घडली. रेखा विजय वाढई (३०) व मनिषा दिनू गुरनुले (३१) असे नदीत बुडून मृत्यू झालेल्या मजूर महिलांची नावे आहेत.
आदिवासी, नक्षलग्रस्त व जंगलव्याप्त असलेल्या चिचगड अपर तहसील कार्यालयाच्या हद्दीतील घोनाडी गावातील काही महिला व पुरुष मजुरी करून नावेत बसून घोनाडी परिसरातील गाढवी नदीतून नावेने परतत असताना नावेचे संतुलन बिघडल्याने नाव नदीत उलटली. नावेत एकूण ७ ते ८ मजूर कामावरून परत येत असल्याची माहिती असून, यापैकी दोन महिलांचा नदीत बुडून मृत्यू झाला. तर इतर मजुरांना पोहता येत असल्याने ते सुखरूप बाहेर निघाले; मात्र रेखा आणि मनिषा या पोहता येत नसल्याने त्यांचा नदीत बुडून मृत्यू झाल्याचे बोलल्या जाते.
प्राप्त माहितीनुसार घोनाडीवरून सरेगाव या गावात मजुरीसाठी काही महिला व पुरुष गाढवी नदीतून नावेने दररोज ये-जा करतात. सरेगावला जाण्यासाठी पायी रस्ता ७ ते ८ किलोमीटर लांब असल्याने हे मजूर नदीच्या मार्गाने ये-जा करतात. सोमवारी सायंकाळी सरेगाववरून गाढवी नदीतून नावेने परत येत असताना ही घटना घडली. या घटनेची माहिती चिचगड पोलिसांना देण्यात आली. या मृत महिलांचे चिचगड येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेमुळे घोनाडी गावावर शोककळा पसरली आहे.