सडक अर्जुनी (गोंदिया) : घरासमोरील विहिरीतील मृत पडलेले बेडूक बाहेर काढण्यासाठी विहिरीत उतरलेल्या दोन युवकांचा विहिरीतील वायू गळतीमुळे मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील घटेगाव येथे शनिवारी (दि.२१) सकाळी १.३० वाजताच्या सुमारास घडली. धर्मराज हिरालाल कोसालकर (३१), संघपाल दुर्योधन पंचभाई (३२) रा. घटेगाव असे मृतक युवकांची नावे आहे.
प्राप्त माहितीनुसार धर्मराज यांच्या घरासमोरील अंगणात विहीर आहेे. शनिवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास तो विहिरीतील मेलेले बेडूक काढण्यासाठी विहिरीच्या आतील कड्यावर उतरला दरम्यान त्याचा तोल गेल्याने तो विहिरीत पडला. ही बाब शेजारी राहणाऱ्या संघपाल यांच्या लक्षात येताच धर्मराजला काढण्यासाठी तो विहिरीत उतरला. दरम्यान तो सुद्धा विहिरीत कोसळला. बराच वेळ होऊन सुद्धा दोघेही विहिरीच्या बाहेर न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्यामुळे परिसरातील लोक धावून आले. मात्र विहिरीत उतरुन त्या दोघांना बाहेर काढण्यासाठी कुणीच विहिरीत उतरले नाही. यानंतर या घटनेची माहिती गावकऱ्यांनी डुग्गीपार पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सचिन वांगडे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. गावकरी व पोलिसांच्या मदतीने विहिरीत पडलेल्या दोन्ही युवकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. दाेन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सडक अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. ही विहीर बरीच जुनी असून त्यात झालेल्या वायू गळतीमुळे दोन्ही युवकांचा मृत्यू झाल्याचे बोलल्या जाते. या प्रकरणाचा तपास डुग्गीपार पोलीस करीत आहे.
..............
दोन्ही युवकांच्या कुटुंबावर शोककळा
शेजारीच राहणाऱ्या दोन्ही युवकांचा विहिरीतील वायू गळतीमुळे मृत्यू झाला. यामुळे धर्मराज आणि संघपाल यांच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे संपूर्ण घटेगाववरच शोककळा पसरल्याचे चित्र होते.