गोंदिया : स्थानिक बाई गंगाबाई महिला रुग्णालयात दाखल असलेल्या एका महिलेला एबी पॉझिटिव्ह रक्ताची गरज होती. मात्र, शासकीय रक्तपेढीत रक्त उपलब्ध नसल्याने महिलेचा जीव धोक्यात आला होता. याची माहिती रक्तमित्र विनोद चांदवानी यांना अभय गौतम यांच्याकडून मिळाली. त्यांनी लगेच एबी पॉझिटिव्ह रक्तगट असलेल्या दोन मित्रांना घेऊन रक्तपेढी गाठून रक्तदान करून गर्भवती महिलेचे प्राण वाचविले.
मागील दीड वर्षापासून सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. त्यामुळे याचा रक्तदान शिबिरावरही परिणाम झाला होता. त्यामुळे राज्यातील सर्वत्र रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यातच कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणानंतर १४ दिवस रक्तदान करता येत नसल्याने, रक्तदान शिबिरांवरही परिणाम झाला होता. त्यामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे बऱ्याचदा रुग्णांच्या नातेवाइकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. प्राप्त माहितीनुसार, स्थानिक बाई गंगाबाई महिला रुग्णालयात एका गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी शनिवारी (दि.१०) दाखल करण्यात आले. या महिलेची प्रसूती झाली. मात्र, प्रसूतीच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने तिची प्रकृती अत्यंत नाजूक झाली होती. डॉक्टरांनी तिला त्वरित रक्त देण्याची गरज असल्याचे सांगितले. मात्र, शासकीय रक्तपेढीत एबी पॉझिटिव्ह रक्त उपलब्ध नसल्याने समस्या निर्माण झाली होती. दरम्यान, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी याची माहिती रक्तमित्र अभय गौतम व विनोद चांदवानी यांना दिली. त्यांनी लगेच आपल्या मित्र परिवारात एबी पॉझिटिव्ह रक्तगट कुणाचा आहे, याचा शोध घेतला. त्यानंतर, डोनर लिस्टमध्ये जितेश अडवानी व सुमित खटवानी या दोघांचा रक्तगट एबी पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळाली. त्यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर, ते दोघेही लगेच लोकमान्य ब्लड बँकेत पोहोचत रक्तदान केले. महिलेला वेळीच रक्त मिळाल्याने तिचे प्राण वाचविण्यास मदत झाली. यासाठी संकल्प जैन, सीए सुनील चावला, राकेश वलेचा, नितीन रायकवार, नावेद आदी रक्तमित्रांनी सहकार्य केले. जितेश अडवानी व सुमित खटवानी यांचा पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
..................
रक्तदानासाठी पुढे या
कोरोनाच्या संकटामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रक्तासाठी बऱ्याचदा रुग्णांच्या नातेवाइकांची तारांबळ उडत आहे. यासाठी रक्तदात्यांनी स्वत:हून पुढे येत रक्तदान महान दान हे ब्रीद जपत रक्तदान करावे, आपण केलेल्या रक्तदानामुळे एखाद्याचे वेळीच प्राण वाचविण्यास मदत होते. रक्तदानासाठी पुढे येण्याचे आवाहन ‘लोकमत’ समूहाने केेले आहे.