सालेकसा : मातीपासून भांडी, मूर्ती व विविध आकर्षक वस्तू बनवून मातीशी नाळ जुळलेला कुंभार समाज हा दुर्लक्षित असून, खादी ग्रामोद्योगाने त्यांना दिलेले अत्याधुनिक साहित्य व त्याचे प्रशिक्षण त्यांना आधार देणारे ठरणार आहे. हा समाज हाताने मातीपासून वस्तू बनवून त्यांची बाजारपेठेत विक्री करून आपला उदरनिर्वाह करतो. तंत्रज्ञानाची साथ घेऊन आता त्यांचे श्रम तसेच वेळ वाचून अधिक उत्पन्न घेता येईल व आर्थिक पाठबळ वाढविता येईल. मातीशी नाळ जुळलेल्या दुर्लक्षितांना यातून आधार मिळणार, असे प्रतिपादन तहसीलदार शरद कांबळे यांनी केले.
इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या वतीने दी आणि ग्रामोद्योग आयोग सूक्ष्म, लघु आणि उद्यम मंत्रालयाच्या दहादिवसीय कुंभार समाज सशक्तीकरण प्रशिक्षणाच्या शुभारंभप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून ठाणेदार प्रमोद बघेले, इंडियन रेडक्रॉस सोसायटी प्रोजेक्ट डायरेक्टर डॉ. प्रकाश धोटे, खादी ग्रामोद्योगचे सशिकांत शेंडे, नगरपंचायत प्रशासकीय अधिकारी ए.ए. वाघमारे, व्यवस्थापिका सहारा लोकसंचालित साधन केंद्र संचालिका शालू साखरे, मधुकर हरिणखेडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले व संत शिरोमणी गोरोबाकाका कुंभार यांच्या छायाचित्रांचे पूजन करून करण्यात आली. याप्रसंगी खादी आणि ग्रामोद्योग आयोग सूक्ष्म, लघु आणि उद्यम मंत्रालयाच्या वतीने कुंभार समाजाच्या उत्थानासाठी, तसेच बळकटीकरणासाठी २० महिलांना व्हिलपोट्री व ब्लेंजर देण्यात आले, तसेच दिलेली यंत्रे चालविण्यासाठी १० दिवसांच्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.
प्रास्ताविक राजेंद्र मिशन यांनी मांडले. संचालन करून आभार पवन पाथोडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी रवी काशलीवाल, नरेश गुप्ता, सुभाष वाघाडे, रामप्रसाद कुंबळे, मनोज वाघाडे, दिलीप वाघाडे, अनिल वाघाडे, सुरेश वाघाडे, दुर्गेश वाघाडे, राजेश वाघाडे, रमेश वाघाडे, संजू ताठीकर, सहयोगिनी अर्चना कटरे, रेखा डोंगरे, दिव्या वाघाडे आदींनी सहकार्य केले.