तालुका कृषी विभागाचा अजब कारभार : राजस्थानी ट्रॅक्टरने केले रात्रीला काम लोकमत न्यूज नेटवर्क परसवाडा : तिरोडा तालुका कृषी अधिकारी कार्यालयांतर्गत महाराष्ट्र शासनाच्या जलसंधारण विभागांतर्गत जलशिवार योजना सुरू आहे. यावर शासन कोट्यवधींचा निधी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देत आहे. पण एकीकडे ‘पाणी अडवा-पाणी जिरवा’च्या नावावर शेतकऱ्याला अडवा अन् पैसे जिरवा, असा गैरप्रकार कृषी अधिकारी कार्यालयातून सुरू आहे. करटी बु. येथे शेतकऱ्यांच्या बांधावर मातीकाम सदर कार्यालयामार्फत करण्यात आले. पण शेतकऱ्यांना याची जाणीवच नाही. कृषी सहायिका हरिणखेडे यांनी शेतकऱ्यांची सहमती व सातबार न घेता अल्प प्रमाणात मातीचे काम ट्रॅक्टरने केले व शेतकऱ्यांच्या धानपिकांच्या समतोल बांध उलट खराब केले. त्यामुळे बांधीत समतोल पाणी न राहता एकाच बाजूने राहील. तर काही ठिकाणी माती घालण्यात आलेच नाही. ऐन शेतीच्या कामात व पीक घालणे सुरू असतानाच शेतकऱ्यांची शेती खराब झालेली आहे. शेतकऱ्यांनी कृषी सहायक हरिणखेडे यांना विचारले असता त्यांनी उलट शब्दात उत्तरे दिली. शासनाच्या नियमाने कामे करू, अधिकारी जसे सांगतील तसे करू, मी महिला कर्मचारी आहे, अशा शब्दात शेतकरी सुरेश पटले यांना उत्तर दिले. तर शेतकऱ्यांनी काय करावे, असा प्रश्न समोर आहे. संपूर्ण काम अल्प प्रमाणात करण्यात आले आहे. काही ठिकाणी बांध जसेच्या तसेच आहेत. जीर्ण धुऱ्यांच्या बांधीवर माती घातले, पण चांल्या धुऱ्यांवर माती न टाकता उलट माती बांधीतच टाकण्यात आली आहे. एका एकराला एका तासात चारही बाजूंनी ट्रॅक्टरने खोदून माती कसीतरी टाकण्यात आली. आजही माती बांधीत आहे. यात फक्त ७५० रूपयांत एक माती काम झाले आहे. तर शासन एका एकराला ३५ ते ४५ हजार रूपये देते. यात हिशेब लावला तर कोट्यवधी रूपयांचा माती बांध कामात गैरप्रकार झाला असावा, असे बोलले जात आहे. शेकडो हेक्टरमध्ये मातीकाम सुरू आहे. संपूर्ण तालुक्यात अशाच प्रकारे काम या विभागामार्फत सुरू आहे. सदर कामाची चौकशी जिल्हाधिकारी यांनी स्वत: करावी. कृषी सहायक मुख्यालयी राहत नाही. तिरोडा येथून कार्यभार चालवित आहेत. त्यांच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा सेवा सहकारी संस्थेचे सदस्य सुरेश पटले, विनय पटले, अंजीलाल पटले, यशवंत लांजेवार, धनपाल पटले, मुकेश अंबुले, छगन बघेले, शिवशंकर बघेले, विवेक कटरे, महेश पटले, नंदकिशोर ठाकरे, गोरेलाल कटरे, विजय पटले यांनी केली आहे. तशी तक्रारही जिल्हाधिकारी, कृषी विभाग व मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आली आहे.
जलयुक्त योजनेच्या मातीबांध कामात गैरप्रकार
By admin | Published: June 24, 2017 1:51 AM