आमगाव : तालुक्यातील चिरचाळबांध येथील सरपंच बलीराम जैयराम तरोणे यांच्या असंतुष्ट कार्यप्रणालीमुळे नऊपैकी सात सदस्यांनी अविश्वास ठराव दखल केला होता. १८ फेब्रुवारीला या अविश्वासावर निर्णय होणार होता, परंतु अविश्वास दाखल करणारे सदस्य ग्रामपंचायत परिसरात दाखल होताच काही सदस्यांनी त्यांना अडवून लाठीकाठीने व तलवारीचा धाक दाखवून विशेष सभेत जाण्यास अटकाव केला. यामुळे तणाव निर्माण झाला होता.यावेळी पोलिसांची उपस्थिती होती. त्यांनी सदस्यांना सुखरुप बाहेर काढले. मात्र राडा करणाऱ्या सदस्यांवर कोणतीच कारवाई केली नसल्याचा आरोप इतर सदस्यांनी केला. चिरचाळबांध ग्रामपंचायत येथे सरपंच बलीराम जैराम तरोणे यांच्याविरूद्ध नऊपैकी सात सदस्यांनी १२ फेब्रुवारीला तहसीलदार यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावावर तहसीलदारांनी निर्णय घेण्यासाठी १८ फेब्रुवारीला दुपारी १२ वाजता विशेष सभेचे आयोजन ग्रामपंचायत कार्यालयात केले होते.सदर अविश्वास एकमताने पारित व्हावा यासाठी ग्रामपंचायत सदस्य हंसकला दुर्गाप्रसाद मांजरकर, कल्पना दिलीप शिवनकर, ललीता केवलचंद भाजीपाले, टेकचंद बेनीराम तुरकर, धनराज क्षीलाल उदभवरे, राकेश लोभीचंद मेंढे, गरीबदास चमारु तुमसरे हे चार चाकी वाहनाने ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभेसाठी परिसरात दाखल झाले. परंतु अगोदरच त्या सदस्यांचा काटा काढण्यासाठी ग्रा.पं.सदस्य मुक्तानंद पटले व इतरांनी सापळा रचला होता. ग्रामपंचायत सदस्य वाहनाने पोहचताच काही कार्यकर्त्यांनी वाहनाला घेराव करुन सदस्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस बंदोबस्त असतानाही कर्मचाऱ्यांना ओढताण करण्यात आली. अविश्वास ठरावावर बोलावलेल्या विशेष सभेत सदस्य गैरहजर असल्याने चर्चा झाली नाही. त्यामुळे प्रस्ताव बाळगळला. जिल्हाधिकाऱ्यांना माहिती देण्यात आल्याचे तहसीलदार राजीव शक्करवार यांनी सांगितले. अडथळा निर्माण करणाऱ्यांविरुद्ध कारवाई निश्चित करणार, असे पोलिसांनी सांगितले. (शहर प्रतिनिधी)
अविश्वास ठरावावरून ग्रा.पं.सदस्यांत राडा
By admin | Published: February 19, 2016 2:04 AM