गाेंदिया : अनियंत्रित स्कॉर्पिओ झाडाला धडकून नाल्यात उलटून झालेल्या अपघातात तीन वर्षीय बालिकेसह आई व आजोबाचा मृत्यू झाला. तर तिघे जण गंभीर जखमी झाले. हा अपघात सोमवारी (दि.६) रात्री ८.३० वाजताच्या सुमारास देवरी-चिचगड मार्गावरील परसोडीजवळ झाला.
लीना अजयकुमार ताराम (३), शकुनबाई अजय ताराम (३२), ग्यासाराम गोखरू उईके, रा. चिपोटा, ता. देवरी, जि.गोंदिया अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. तर मुशफिर कुरेशी (२२), ओमप्रकाश सोनजल (१६) रा. ककोडी व वाकेश्वरी घनश्याम उईके (२३) रा. चिपोटा अशी गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत. एमएच-३५/एम-०८२४ क्रमांकाची स्काॅर्पिओ सोमवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास चिपोटा व ककोडी क्षेत्रातील लोकांना घेऊन देवरीकडून ककोडीकडे जात हाेती. दरम्यान परसोडी गावाजवळील नाल्याजवळ वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने स्काॅर्पिओ अनियंत्रित होऊन झाडाला आदळून नाल्यात उलटली. यात लीना ताराम या तीन वर्षीय बालिकेसह, शकुनबाई ताराम, ग्यासाराम उईके या तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर मुशफिर कुरेशी, ओमप्रकाश सोनजल व वाकेश्वरी घनश्याम उईके (२३) हे तीन जण गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत वाहनात फसलेल्या लोकांना बाहेर काढले. तसेच जखमींना त्वरित चिचगड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तिथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करुन गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. तीन वर्षीय बालिकेसह आई व आजोबाचा या अपघातात घटनास्थळीच मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
एक दिवसापूर्वीच झाली रुग्णालयातून सुट्टी
शकुनबाई अजय ताराम हिची देवरी तालुक्यातील फुटणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झाली होती. यानंतर तिला सोमवारी रुग्णालयातून सुटी देऊन तिच्या सालई येथील नातेवाईकांकडे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वाहनाने सोडून देण्यात आले होते. यानंतर तिचे नातेवाईक ककोडी चिपोटा येथून स्काॅर्पिओ वाहन घेऊन सालई येथे घेण्यासाठी आले होते. दरम्यान, तिचे नातेवाईक तिला सालई येथून सोमवारी (दि.६) रात्री चिपोटा येथे घेऊन जात असताना हा अपघात झाला.
आनंदाचे वातावरण क्षणात दु:खात बदलले
सून घरी येणार म्हणून ताराम कुटुंबीय आनंदात होते; मात्र काळाच्या मनात वेगळेच काही होते; मात्र नातेवाईकासह घरी परतत असताना सून, नात व आजोबाचा मृत्यू झाल्याने ताराम कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला अन् क्षणात आनंदाचे क्षण दु:खात बदलले.