लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील मुख्य मार्गावरील रेल्वे पुलाखाली जवळपास ५० कुटुंब गेल्या ५० वर्षांपासून घरे बांधून राहत होती. जुन्या उड्डाणपुलाची मुदत संपल्याने ते पाडण्याचे काम आता सुरू असून यामुळे मात्र या पुलाखाली राहणाऱ्या ५० कुटुंबीयांच्या घरातील सामान पोलीस संरक्षणात बाहेर काढून त्यांचे घर बुलडोझरने पाडण्यात आले. त्यामुळे त्यांना आता आपल्या मुलाबाळासह उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. यादरम्यान जुन्या पुलाखाली तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. आक्रमक झालेल्या बेघर कुटुंबीयांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्यात ठिय्या मांडण्याचा निर्धार केला आहे. शहरातील जुन्या उड्डाणपुलाच्या खाली भांडे, कपडे धुणे आणि साफसफाई करण्याचे काम करणाऱ्या मजुरांचे सुमारे ५० कुटुंबीय गेल्या ५० ते ६० वर्षांपासून वास्तव करीत आहे; मात्र जुन्या पुलाला पाडण्याचे काम सुरू असल्याने त्यांची घरे हटविण्याची गरज आहे. अशात रविवारी (दि.५) त्यांच्या घरांवर बुलडोझर चालविण्यात आला. अचानकपणे कुटुंबांवर बेघर होऊन रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. आजपर्यंत या कुटुंबांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेतला. आता आम्ही कुठे जाऊ अशी आर्त हाक लहान मुलांपासून वयस्क महिला करीत आहेत. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत गरजा असूनसुद्धा आज या कुटुंबावर उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. शासनाने त्यांना बेघर केले; मात्र आता या कुटुंबांना निवाऱ्याची सोय होणार की नाही, हे सर्व कुटुंब जाणार कुठे? हा प्रश्न आहे. त्यांचे पुनर्वसन करण्याची मागणी होत आहे.