तावशी खुर्द येथील रंगमंच : यंत्रणा व लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष लोकमत न्यूज नेटवर्क बोंडगावदेवी : लोकप्रतिनिधी आपल्या कोट्यातील व विशेष प्रयत्नांनी मंजूर केलेल्या विकास कामांची यादी प्रसार माध्यमातून प्रकाशित करण्याचा मोह टाळत नाही. आमच्या प्रयत्नांनी केलेल्या कामाचा गवगवा करण्यात लोकप्रतिनिधी पुढे राहतात. परंतु मंजूर झालेली विकास कामे पूर्ण झाली का? किती प्रगतीपथावर आहेत. त्या कामांचा दर्जा कसा आहे याकडे मात्र मुद्दाम डोळेझाक होत असल्याचे प्रकर्षाने जानवते आहे. गेल्या दोन-तीन वर्षापूर्वी स्थानिक आमदार विकास निधीतून मंजूर झालेले बांधकाम आजही अर्धवट असून संबंधीत यंत्रणेकडून कोणताही पाठपुरावा केल्याचे दिसून येत नाही. तावशी/खुर्द येथील बुध्द विहारासमोरील रंगमंच अर्धवट उभाच असलेल्या स्थितीत दिसत आहे. याबाबत प्राप्त माहितीनुसार, तालुक्यातील महालगाव गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या तावशी/खुर्द येथील बुध्द विहाराजवळ स्थानिक आमदार विकास निधी अंतर्गत एक रंगमंच मागील काही वर्षापूर्वी मंजूर झाले होते. संबंधीत कंत्राटदाराकडून बांधकामाला सुरूवात करण्यात आली. गावातील बौध्द समाजाच्या प्रतिनिधींना विश्वासात न घेता स्वत:चे हीत जोपासून कंत्राटदारांनी रंगमंदिराच्या बांधकामाला सुरूवात केली. बुध्द विहाराच्या समोरील होणारे बांधकाम साजेसे होणार नाही म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधीत कंत्राटदाराला सुचना दिल्या. तेव्हापासून आजपर्यंत त्या अर्धवट बांधकामाला गती आलेली दिसत नाही. ९ इंच जाडीच्या दोन भिंती उभ्या केल्या आहेत. तावशी येथील बौध्द समाजाच्या प्रतिष्ठीत नागरिकांनी सडक-अर्जुनीच्या उपविभागीय अभियंत्याशी संपर्क साधून बांधकाम सुरु करण्याची मागणी केली. सदर बांधकामाला वाढीव निधी सुध्दा मंजूर होऊन बांधकामाचा करारनामा झाल्याचे समजते. सर्व सोपस्कार होऊन सुध्दा स्थानिक आमदार विकास निधीतून मंजूर झालेल्या रंगमंदिराचे बांधकाम आजघडीला सुरू झालेले दिसत नाही. मंजूर केलेल्या कामाचा गवगवा करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी मंजुर झालेल्या कामाच्या बांधकामाच्या प्रणालीचा अहवाल जाणून घेणे सुध्दा गरजेचे आहे. मागील काही वर्षापासून मंजूर झालेले रंगमंदिर तावशी येथील बौध्द बांधवांना पुर्णावस्थेत केव्हा दिसेल असा प्रश्न तेथील नागरिक करीत आहेत. मंजुर कामाला बांधकामाची गती द्यावी अशी मागणी तावशी येथील बौद्धबांधव करीत आहेत.
आमदार निधीतून अर्धवट बांधकाम
By admin | Published: May 10, 2017 1:04 AM