सडक-अर्जुनी : वीज वितरण कंपनीच्या वतीने ग्रामपंचायतींना पथदिव्यांसाठी देण्यात आलेले कनेक्शन बिल न भरल्यामुळे कापण्यात आले आहे. यामुळे आता पावसाळ्यातही गाव रात्रीला अंधारात राहणार आहे. यावर सरपंच सेवा संघाच्या वतीने आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांना निवेदन देऊन पथदिव्यांचे कनेक्शन पूर्ववत करण्याची मागणी केली.
ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीच्या बळकटीकरणासाठी ग्रामपंचायतींना स्ट्रीट लाईट जोडणी करून त्यांचे वीज बिल जिल्हा परिषदेच्या वतीने भरले जात होते; मात्र मागील युती शासनाच्या काळात या योजनेकरिता निधीच न दिल्यामुळे जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींचे पथदिव्यांचे कनेक्शन महावितरणने ग्रामपंचायतींना कोणतीही पूर्वसूचना न देता कापले. आता ऐन पावसाळ्याच्या दिवसात कनेक्शन कापल्यामुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. यावर तालुका सरपंच सेवा संघाच्या वतीने आमदार चंद्रिकापुरे यांना निवेदन देऊन पथदिव्यांचे कनेक्शन पूर्ववत करण्याची मागणी केली आहे. निवेदन देताना संघटनेचे अध्यक्ष डी. यू. रहांगडाले, सचिव दिनेश कोरे, सल्लागार दिनेश हुकरे, मोहन सुरसाऊत, हेमराज खोटेले यांच्यासह तालुक्यातील अनेक सरपंच उपस्थित होते.