शिपाई भरतीची वयोमर्यादा वाढवा
आमगाव : मागील २-३ वर्षांपासून पोलीस शिपाई भरती प्रक्रिया झालेली नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील लाखो तरुण बेरोजगार आहेत. ते पोलीस भरतीच्या प्रतीक्षेत आहेत. महाराष्ट्राच्या बेरोजगार युवकांच्या दृष्टिकोनातून पोलीस भरतीसाठी वयोमर्यादा ३३ वर्षांवरून ३५ वर्षं करण्यात यावी, अशी मागणी तयारी करीत असलेल्या बेरोजगार तरुणांनी केली आहे.
लक्ष लागले आता नुकसानभरपाईकडे
केशोरी : ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या परतीच्या पावसाने आणि तुडतुडा, करपा, खोडकिडा या कीडरोगांनी खरीप हंगामातील धानपिकाची नासाडी झाली. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अपकृपेने हिरावून घेतला. कृषी विभागाने झालेल्या नुकसानीची पाहणी करून पंचनामे केले आणि मदत मिळण्याचे प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविले आहेत. आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकऱ्यांचे लक्ष शासनाकडून मिळणाऱ्या नुकसानभरपाईकडे लागले आहे.
रोजगार सेवकांना अत्यल्प मानधन
गोरेगाव : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी झटणारे रोजगार सेवक संकटात आहेत. लोकांच्या हाताला काम द्यावे म्हणून मनरेगांतर्गत काम उपलब्ध करून देण्यात त्यांची जबाबदारी आहे. मनरेगा कामाची जबाबदारी पार पाडणाऱ्या रोजगार सेवकांनाच अत्यल्प मानधनावर काम करावे लागत आहे. रोजगार सेवकांच्या या मागणीकडे शासनाने लक्ष देऊन ही मागणी लवकर पूर्ण करण्यात यावी, अशी मागणी रोजगार सेवक संघटनेने केली आहे.
घोगरा ते देव्हाडा रस्त्यांची दुरवस्था
मुंडीकोटा : जवळील ग्राम घोगरा ते देव्हाडा रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, या रस्त्याने पायी चालणेही कठीण झाले आहे. हा रस्ता अपघाताला आमंत्रण ठरत आहे. घोगरा ते देव्हाडा या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले दिसत आहेत. गिट्टी व मुरूम उखडून बाहेर रस्त्याच्या कडेला पडलेला आहे. हा रस्ता पूर्णपणे जीर्ण आहे.
दिव्यांग, निराधारांवर उपासमारीची वेळ
परसवाडा : तिरोडा तालुक्यातील संजय गांधी, श्रावण बाळ, विधवांना, आर्थिक कुटुंब साहाय्यांना चार-पाच महिन्यांपासून अनुदान न मिळाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
ब्रेकर ठरत आहेत धोकादायक
गोंदिया : शहरात आजघडीला मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर ब्रेकर तयार करण्यात आले आहेत. यामुळे वाहनांची गती कमी करावी लागते हे खरे. मात्र, ब्रेकरच्या झटक्यांमुळे कित्येकदा अपघातही घडत आहेत.
विश्रामगृह तयार करण्याची मागणी
केशोरी : जिल्हास्थळावरून या भागाची पाहणी करण्यासाठी किंवा शासकीय कामासाठी येणारे वरिष्ठ अधिकारी, आमदार, खासदार येथे येतात. त्यांना थांबण्यासाठी येथे विश्रामगृहाची आवश्यकता आहे.
वातावरणातील बदलामुळे भीती
तिरोडा : वातावरणातील बदलामुळे नागरिकांना सर्दी, खोकला, ताप व डोकेदुखी यासारख्या आजारांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे सावट निर्माण झाले आहे.
रेल्वे चौकीला उड्डाणपुलाची प्रतीक्षा
आमगाव : किडंगीपार येथील मुंबई-हावडा मार्गावर असलेली रेल्वे चौकी मालवाहतूक व प्रवासी वाहनांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. या मार्गावरील रेल्वे चौकीवर उड्डाणपुलाची मागणी प्रलंबित आहे.
अवजड वाहतुकीमुळे रस्त्यांची लागली वाट
रावणवाडी : गोंदिया तालुक्यातील बनाथर, कासा, तेढवा, जिरूटोला परिसरातील वाळूघाटांचा लिलाव सुरू झाला नाही, तरीही मोठ्या प्रमाणात अवैध वाळूउपसा सुरू आहे. वाळूचे ट्रॅक्टर रात्रंदिवस धावत असल्याने गावकुसातील रस्ते उखडले आहेत. त्यामुळे अपघातांची शक्यता वाढली असून, याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे गावकऱ्यांची समस्या कायम आहे. गोंदिया तालुक्यातील वाळूघाटांतून मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या वाळूचे उत्खनन केले जात आहे. वाळू भरून जाणाऱ्या ट्रॅक्टरमुळे कासा, जिरुटोला, कोरणी, बनाथर, तेढवा रस्त्याची स्थिती खराब झाली आहे. विशेष म्हणजे, वाळूमाफियांना महसूल विभागाचे अधिकारी कारवाईसाठी येत असल्याची माहिती सुरुवातीलाच मिळत असते. ते आपल्या जवळची व्यक्ती रावणवाडीपासून घाटाकडे जाणाऱ्या मार्गावर तैनात करत असतात. ही व्यक्ती अधिकारी, कर्मचारी येत असल्याची सूचना माफियांना देत असतात. कधी काळी सेटिंग करून कर्मचाऱ्यांना मोकळे करत असतात. परिणामी, शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. प्रशासकीय अडचणीमुळे वाळूघाटांचा लिलाव झाला नसल्याचे बोलले जाते. वाळूमाफिया गावातील कच्चे रस्ते आणि पांगडी रस्त्यावरून वाळूची वाहतूक करत असल्याने रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. त्यामुळे कधीही मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन वाळूमाफियांच्या मुसक्या आवळाव्यात, अशी मागणी होत आहे.
निराधारांना मानधनाची प्रतीक्षा
गोरेगाव : कोरोना संसर्गाच्या काळात निराधारांना मानधनाची प्रतीक्षा कायम आहे. गत काही महिन्यांपासून निराधारांना मानधन मिळाले नाही. अनेकांची आज उपासमार होत आहे. बँकेत चौकशी करावी, तर कोरोनामुळे बाहेर निघणेही कठीण आहे, अशा स्थितीत निराधार जीवन जगत आहे.
तिरोड्यात जनावरांचे रस्त्यांवर अतिक्रमण
तिरोडा : तालुक्यातील प्रत्येक गावांमध्ये रस्त्यावर गावांतील नागरिक जनावरे बांधतात. त्यामुळे ये-जा करणाऱ्यांना त्रास होत आहे. नगरपंचायतीने या प्रकाराकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याची गरज असताना दुर्लक्ष होत आहे.
प्रखर दिव्यांमुळे अपघाताची शक्यता
देवरी : दुचाकी व चारचाकी वाहनांच्या पुढे हेडलाइट लावले जातात. मात्र, काही तरुण साधे दिवे न लावता, निळ्या रंगाचे, तसेच प्रखर दिवे लावत असल्यामुळे अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी अशा तरुणांवर कारवाई करून अपघाताला आळा घालावा.