भजे, समोसे, पकोडे विकून साजरा केला बेरोजगार दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 05:00 AM2021-09-18T05:00:00+5:302021-09-18T05:00:10+5:30
अनेक युवकांकडे मेडिकल, इंजिनिअरिंग, शिक्षणशास्त्र यासह अनेक विषयांतील डिग्री आहेत. मात्र, त्यांना रोजगार मिळाला नसल्याने रोजगार हमीच्या कामावर जाऊन उदरनिर्वाह भागवावा लागत आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध नोंदवीत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी डिग्री लावून चहा व समोशाची विक्री केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : केंद्रात सत्तेवर येण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठमोठी आश्वासने दिली होती, तर दरवर्षी दोन कोटी बेरोजगारांना राेजगार देण्याचे आश्वासन दिले होते; पण मागील तीन वर्षांत यापैकी एकाही आश्वासनाची पूर्तता त्यांनी केली नाही. त्यामुळे बेरोजगारीच्या समस्येत वाढ झाली आहे. याचाच निषेध नोंदवीत जिल्हा युवक काँग्रेस आणि एनएसयूआयने शुक्रवारी (दि.१७) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी भजे, समोसे, पकोडे विकून बेरोजगार दिवस साजरा केला.
जिल्हा युवक काँग्रेस व एनएसयूआयच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शहरातील नेहरू चौक व जयस्तंभ चौक येथे दुपारी १२ वाजता पकोडे विकून अनोखे आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी हातगाडीवरून भजे, समाेसे, पकोडे आणि चहा विक्रीचे प्रतीकात्मक दुकान लावून ग्राहकांना त्याची विक्री केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील समस्त बेरोजगारांची दिशाभूल केली, म्हणून त्यांचा वाढदिवस बेरोजगार दिवस म्हणून साजरा करीत असल्याचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष आलोक मोहंती यांनी सांगितले.जिल्हा युवक काँग्रेस व एनएसयूआयच्या या अनोख्या आंदोलनाने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले होते.
डिग्री लावून केली पकोड्यांची विक्री
- अनेक युवकांकडे मेडिकल, इंजिनिअरिंग, शिक्षणशास्त्र यासह अनेक विषयांतील डिग्री आहेत. मात्र, त्यांना रोजगार मिळाला नसल्याने रोजगार हमीच्या कामावर जाऊन उदरनिर्वाह भागवावा लागत आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध नोंदवीत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी डिग्री लावून चहा व समोशाची विक्री केली.
हे झाले आंदोलनात सहभागी
- यावेळी आ. सहर्षराम कोरोटे, एनएसयूआई अध्यक्ष हरीश तुळसकर, गप्पू गुप्ता, शहरध्यक्ष जहीर अहमद, युवक काँग्रेस प्रदेश सचिव रुचित देवे, शहर महासचिव दलेश नागदवने, अमर राऊत, बंटी कोठारी, मनीष चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष मजहर खान, विधानसभा अध्यक्ष बाबा बागडे, शहराध्यक्ष रवी चौरसिया, दीपेश अरोरा, राजू गिल, उपाध्यक्ष कीर्ती येरणे, एनएसयूआई शहराध्यक्ष रुकनेज शेख, तालुकाध्यक्ष शैलेश बिसेन, वारीस भगत, कृष्णा बिभार, अनिल रंगिरे, मंथन नंदेश्वर, अमित मरुन्बान, विक्की रहांगडाले, शाहरुख सोलंकी, अमन रोगाटिया सहभागी झाले होते.