गोरेगाव (गोंदिया) : अज्ञात व्यक्तीने धाण्याच्या पुंजण्याला आग लावली. यात दोन एकरांतील धानाचे पुंजणे जळून खाक झाल्याची घटना तालुक्यातील पाथरी भुताईटोला येथे रविवारी (दि. १३) सायंकाळच्या सुमारास घडली. त्यामुळे शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळले असून वर्षभर कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
प्राप्त माहितीनुसार, तालुक्यातील भुताईटोला येथील शेतकरी ढिवरू चंदू रहांगडाले यांनी आपल्या दोन एकर शेतातील धानाची कापणी करून मळणी करण्यासाठी धानाचे पुंजणे तयार करून शेतात ठेवले होते. दोन दिवसांनी धानाची मळणी करून धानाची विक्री करण्याची तयारी त्यांनी केली होती. पण, रविवारी सायंकाळच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने त्यांच्या शेतातील धानाच्या पुंजण्याला आग लावली. यात संपूर्ण दोन एकरांतील धानाचे पुंजणे जळून राख झाले.
पुंजण्याला लागलेली आग विझविण्यासाठी गोरेगाव नगरपंचायतीच्या अग्निशमन वाहनाला पाचारण करण्यात आले. पण, आगीने क्षणात रौद्र रूप धारण केल्याने संपूर्ण धानाची राखरांगोळी झाली. यामुळे रहांगडाले यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. घटनेची माहिती गोरेगाव पोलिस ठाणे व तलाठ्याला देण्यात आली. शासनाने शेतकरी ढिवरू रहांगडाले यांना आर्थिक मदत देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे केवल बघेले यांनी केली आहे.