निकृष्ट साहित्याचा वापर : कंत्राटदार व वन अधिकाऱ्यांचे संगनमतनिंबा (तेढा) : आजच्या काळात एकही क्षेत्र किंवा विभाग असा नाही ज्यात भ्रष्टाचार होत नाही. अनेक विभागांमध्ये लाखोंचा भ्रष्टाचार केला जातो. कामामध्ये निकृष्ट साहित्याचा वापर करुन लाखोंचा फायदा कंत्राटदार व कर्मचाऱ्यांच्या संगनमताने घेतला जातो, असाच एक भ्रष्टाचाराचा प्रकार वनविभागात घडला आहे.गोरेगाव वनक्षेत्रांतर्गत येणाऱ्या निंबा राऊंड येथील निंबा बिटातील जंगलामध्ये नाल्यांवर पाणी अडविण्यासाठी व तिथेच मिरविण्यासाठी एकूण २८ जा.बी.एन. बंधाऱ्यांचे बांधकाम ई-निविदा टेंडरद्वारे काढण्यात आले होते. हे काम टेंडरद्वारे एका कंत्राटदाराला मिळाले पण त्या कामामध्ये कंत्राटदार व वन अधिकाऱ्यांच्या संगनमताने लाखोचा भ्रष्टाचार करण्यात आला. या बंधारा बांधकामाच्या अंदाजपत्रकामध्ये बंधाऱ्याला पिचींग करण्याचे प्रोविजन होते व पिचींग करण्यासाठी दगड खरेदी करुन वापरायचे होते. परंतु कंत्राटदाराने वन अधिकाऱ्यांच्या संगणमताने जंगलातीलच दगड खोदून व वेचून बंधाऱ्याच्या पिचींगचे काम पूर्ण केले. त्या दगडांच्या खरेदीचे बोगस बिल वन अधिकाऱ्यांच्या देखरेखीमध्ये बनवून ते बिल कामाच्या बिलात जोडून लाखो रुपये गडप केले.या प्रकरणी राऊंड आॅफिसर शेंडे यांना विचारले असता गोलमोल उत्तर देऊन क्षेत्रातील लोकांना भुलथाप दिल्या. वरील बंधारा बांधकामाचे बिल पास करतेवेळी वरिष्ठ वन अधिकारी यांनी त्या कामांची चौकशी करुन सुद्धा दगड खरेदीचे बोगस बिल लाऊन वन विभागाच्या कामांत पैसाच गैरवापर केला आणि शासनाची दिशाभूल केली आहे. यावर संबंधित विभागाने कंत्राटदार व संबंधित वन अधिकाऱ्यांवर योग्य कार्यवाही करण्याची मागणी क्षेत्रातील जनतेने केली आहे. (वार्ताहर)
वनविभागाच्या कामात गैरप्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2017 1:06 AM