गोंदिया : तिरोडा तालुक्यातील ग्राम चूरडी येथे घडलेल्या हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्राला काळिमा फासला आहे. मात्र ५ दिवस लोटूनही आरोपींचा शोध लागलेला नाही. अशात पोलिसांनी लवकरात लवकर हे गूढ उकलून आरोपींवर कठोर कारवाई करावी, असे आदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पोलीस अधीक्षकांना दिले.
ग्राम चूरडी येथील बिसेन कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांनी सांत्वन केले व संपूर्ण प्रकरण जाणून घेतले. एकाच कुटुंबातील चार जणांचा जीव गेल्याने समाजमन सुन्न करणाऱ्या या घटनेला आता ४ दिवसांचा कालावधी लोटूनही या गुन्ह्यात अद्याप कुणालाही अटक केलेली नाही. शिवाय रेवचंद यांची हत्या की आत्महत्या, या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरीत आहे. यावर पटोले यांनी, पोलीस विभागाने योग्य चौकशी करून आपली तपासचक्रे गतिमान करावीत व या हत्याकांडाचे गूढ लवकर समोर आणावे, असे आदेश दिले. तसेच आरोपींना फाशी द्यावी, अशी मागणी पोलीस विभाग व मुख्यमंत्र्यांना केली जाईल असे सांगितले.
यावेळी माजी आमदार दिलीप बंसोड, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष एन. डी. किरसान, प्रदेश सचिव अमर वराडे, तालुकाध्यक्ष राधेलाल पटले, लक्ष्मीनारायण दुबे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.