गोंदिया : विदर्भासह जिल्ह्यातील वातावरणात अचानक बदल दिसून येत आहेत. काही दिवसांपूर्वी उबदार वातावरण जाणवत असताना, आता अवकाळी पावसामुळे थंडीने जोर धरल्याचे दिसून येत आहे. पावसामुळे दिवसाही थंडीचा जोर होता व शहरासह ग्रामीण भागात शेकोट्या पेटू लागल्या आहेत. गत आठवडाभर ढगाळ वातावरणामुळे दमट वातावरणाची अनुभूती होती. असे असतानाच मात्र सोमवारी पावसाने हजेरी लावली व थंडीचा जोर वाढला होता. मात्र, मंगळवारी (दि. २८) सकाळपासूनच दमदार पाऊस बरसला व त्यामुळे थंडीचा चांगलाच जोर वाढला होता. यामुळे दिवसाही नागरिकांना गरमीसाठी शेकोटी पेटविण्याची पाळी आली होती. विशेष म्हणजे, पावसामुळे कमाल तापमान १९.९ अंशांवर तर किमान तापमान १५.९ अंशांवर आले होते.
अचानकच थंडीचा जोर वाढला व त्यात पावसामुळे विशेषतः लहान बालके व वृद्धांना त्रास सहन करावा लागत आहे, तर शहरासह ग्रामीण भागातील नागरिक थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोटीचा आधार घेताना निदर्शनास येत आहे. कपाटात ठेवलेले उनी कापडांचा वापर वाढला असून, काळजी घेतली जात आहे.
थंडी रब्बीसाठी पोषक
गत काही दिवसांपासून जिल्ह्यात छान थंडी पडली आहे. त्यामुळे पिके बहरण्यास सुरुवात झाली आहे, थंडीमुळे रब्बी पिकास पोषक असे वातावरण निर्माण झाले आहे. वाढती थंडी पाहता शेतकरी सुखावला आहे. गहू, ज्वारी, हरभरा पिके आता बहरताना दिसत आहेत. या थंडीचा रब्बी पिकांसाठी चांगला फायदा होणार आहे.
बुधवारीही यलो अलर्ट
हवामान खात्याने अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला होता व सोमवारी आणि मंगळवारीही जिल्ह्याला यलो अलर्ट दिला होता. त्यानुसार, मंगळवारी अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. मात्र, आता हवामान खात्याने बुधवारीही (दि.२९) जिल्ह्याला यलो अलर्ट दिला आहे. यामुळे बुधवारीही पाऊस बरसल्यास थंडीचा जोर आणखी वाढणार आहे.
अशी घ्या काळजी
वातावरणातील या बदलामुळे सकाळी फिरायला जाणाऱ्या लोकांना सर्दी, खोकल्याचाही त्रास होऊ शकतो. त्या दृष्टीने सतर्कता म्हणून तोंडाला मास्क अथवा रुमाल बांधूनच फिरायला जावे.