सडक-अर्जुनी : एकस्तर वेतनश्रेणी हा नक्षलग्रस्त भागात कार्यरत कर्मचाऱ्यांचा हक्क आहे. परंतु एकाच पदावर १२ वर्षे पूर्ण झाल्यानंतर चटोपाध्याय वेतनश्रेणी लागू झाल्यावर एकस्तर बंद करण्यात येतो. हा नक्षलग्रस्त क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अन्याय आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने सन २०१९ पासून लढा सुरू केला आहे. कर्मचारी जोपर्यंत नक्षलग्रस्त भागात कार्यरत आहे, तोपर्यंत एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी शिक्षकांनी एकमताने केली आहे.
पी.एम. मेश्राम यांच्या अध्यक्षतेत कोहमारा येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची सभा गुरुवारी (दि. २३) घेण्यात आली. सभेत एकस्तर वेतनश्रेणीला घेऊन शिक्षकांनी एकमताने मागणी केली. सभेला विजय गजभिये, वाय. एस. मुंगुलमारे, विजय डोये उपस्थित होते. सभेत सरचिटणीस किशोर बावनकर यांनी वेळोवेळी निवेदन देऊनही मागणी पूर्ण न झाल्यामुळे शेवटी उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे दाद मागण्यासाठी ३९१ शिक्षकांची याचिका दाखल केली. अतिरिक्त प्रदान वसुलीला स्थगिती मिळवण्यात संघाने यश मिळविले आहे. त्यामुळे पुन्हा काही उरलेल्या शिक्षकांना न्याय मिळावा म्हणून संघाने एकस्तर वेतन श्रेणीचा लढा सुरू केला आहे. अशात कोणत्याही अपप्रचाराला बळी न पडता या आंदोलनात सहभागी व्हावे असे सांगितले. सभेचे संचालन राहुल कोतंमवार यांनी केले. आभार सुरेश अमले यांनी मानले. सभेला तालुक्यातील शिक्षक मोठ्या संख्येत उपस्थित होते.