गोंदिया : मागील चार - पाच दिवसांपासून अवकाळी पाऊस सातत्याने हजेरी लावत असल्याने रब्बीतील धान कापणी संकटात आली आहे, तर हवामान विभागाने १५ मेपर्यंत जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे बळीराजावरील अवकाळीचे ढग कायम आहे.
जिल्ह्यात खरिपानंतर रब्बीचीसुद्धा मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. यंदा सिंचन प्रकल्पांमध्ये पुरेसा पाणीसाठा असल्याने रब्बीच्या लागवड क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. यंदा ६६ हजार हेक्टरवर रब्बीची लागवड करण्यात आली. रब्बी पिकांसाठी अनुकूल वातावरण आणि सिंचनाची सोय झाल्याने धानाचे पीकसुद्धा चांगले होते. त्यामुळे खरिपापेक्षा अधिक उत्पादन होण्याची शक्यता वर्तविली जात होती, तर शेतकऱ्यांमध्येसुद्धा आनंदाचे वातावरण होते. मागील आठ-दहा दिवसांपासून शेतकऱ्यांनी रब्बीच्या धान कापणीला सुरुवात केली. जवळपास ७ ते ८ हजार हेक्टरवरील धान कापणी पूर्णसुद्धा झाली आहे. मात्र याच दरम्यान अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्याने कापणी केलेले धानपीक संकटात आले आहे. मागील पाच दिवसांपासून अवकाळी पाऊस सातत्याने हजेरी लावत आहे तर काही भागात गारपीटसुद्धा झाली त्यामुळे कापणी केलेल्या धानाच्या कडपा भिजल्याने मोठ्या प्रमाणावर धान खराब झाले आहे. काही शेतकऱ्यांच्या कापणी केलेल्या धानाच्या बांध्यामध्ये पाणी साचल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जवळपास ७ ते ८ हजार हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात केली असून, ५०० हेक्टरमधील पिकांचे सर्वाधिक नुकसान झाल्याची बाब पुढे आली आहे. या आकड्यात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.
.............
चार तालुक्यांमध्ये सर्वाधिक नुकसान
अवकाळी पावसामुळे गोंदिया, तिरोडा, अर्जुनी मोरगाव आणि सालेकसा तालुक्यातील धान पिकांचे सर्वाधिक नुकसान झाल्याची बाब कृषी विभागाने केलेल्या प्राथमिक सर्वेक्षणात पुढे आली आहे. कृषी आणि महसूल विभागाने सर्वेक्षण सुरू केले असून, नुकसानीच्या आकड्यात आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
...............
सकाळी ऊन संध्याकाळी पाऊस
मागील पाच दिवसांपासून अवकाळी पाऊस दररोज हजेरी लावत आहे. सकाळी कडक ऊन असते मात्र संध्याकाळ होताच पुन्हा आकाशात ढग दाटून येत पावसाला सुरुवात होते. हाच क्रम सुरू आहे. तर हवामान विभागाने पुन्हा चार दिवस पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे ऊन पावसाचा खेळ आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे.
.........
काेट
हवामान विभागाने जिल्ह्यात १५ मेपर्यंत अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे तूर्तास शेतकऱ्यांनी धानाची कापणी करू नये, तसेच कापणी केलेला धान सुरक्षित ठिकाणी प्लॅस्टिक झाकून ठेवावा. पावसामुळे पिकांवर कीडरोगांचा प्रादुर्भाव वाढू शकतो.
- गणेश घोरपडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.