सालेकसा : मागील तीन-चार दिवसांपासून अवकाळी पाऊस व गारपीट होत असल्याने रब्बी हंगामातील धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी कावराबांध येथील शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते पुरुषोत्तम बनोठे यांनी केली आहे.
तालुक्यातील कावराबांध, बिंझली, खोलगड, नानव्हा या भागात सोमवारी सायंकाळच्या सुमारास गारपीट आणि अवकाळी पाऊस झाला. जवळपास अर्धा तास झालेल्या पावसामुळे शेतातील बांध्यामध्ये पाणी साचले होते. त्यामुळे कापणी रब्बी हंगामातील धानाच्या कडपा मोठ्या प्रमाणात भिजल्याने धान पाखड आणि खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मागील तीन-चार दिवसांपासून अवकाळी पाऊस सातत्याने हजेरी लावत आहे. त्यातच तालुक्यात सध्या रब्बी धानाची कापणी जोमात सुरू आहे. बऱ्याच शेतकऱ्यांच्या धानाची कापणी पूर्ण झाली आहे. या धानाला अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसला. त्यामुळे शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावल्याने शेतकऱ्यांवर संकट ओढावले आहे. त्यामुळे कृषी विभागाने त्वरित नुकसानीचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
............
बॉक्स
कोरोटे यांनी केली नुकसानीची पाहणी
तालुक्यात गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसामुळे धानाचे उभे पीक उद्ध्वस्त झाले. आमदार सहषराम कोरोटे यांनी कावराबांध बिंझली, घोन्सी या गावालगत नुकसानग्रस्त धान पिकांची पाहणी केली. तसेच कृषी आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना पंचनामे करून नुकसान अहवाल शासनाकडे पाठविण्यास सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत तहसीलदार शरद कांबळे, नायब तहसीलदार एस. बी. उपरीकर, एस. के. गणवीर, डी. व्ही. ठाकरे, तलााठी सहारे, काँग्रेस तालुकाध्यक्ष वासुदेव चुटे, पुरुषोत्तम बनोठे, देवचंद ढेकवार, हरिलाल रत्नाकर व शेतकरी उपस्थित होते.
..........
कोट
ज्या शेतकऱ्यांच्या धानाचे अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान झाले. त्याचे पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी.
-पुरुषोत्तम बनोठे, शेतकरी