लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात मागणीपेक्षा युरियाचा पुरवठा कमी झाल्याने तुटवडा निर्माण झाला होता. परिणामी रोवणीच्या कामावर याचा परिणाम झाल्याने शेतकरी अडचणीत आले होते. लोकमतने हा विषय लावून धरल्यानंतर जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाने याची दखल घेत युरियाची तातडीने मागणी केली आहे. शनिवारी (दि.२५) जिल्ह्यात २६०० मेट्रिक टन युरियाची रॅक लागणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील युरियाची कोंडी आता पूर्णपणे सुटणार आहे.जिल्ह्यात यंदा सर्वाधिक १ लाख ८९ हजार हेक्टरवर खरिपातील धानाची लागवड करण्यात येणार आहे. सध्या स्थितीत जिल्ह्यातील ४० टक्के रोवण्या आटोपल्या आहेत. ६० टक्के रोवण्या शिल्लक आहे. धानाच्या रोवणी दरम्यान शेतकऱ्यांना सर्वाधिक युरियाची गरज असते. मात्र जिल्ह्यात मागील आठ ते दहा दिवसांपासून युरियाची टंचाई निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना युरिया मिळत नसल्याने काही प्रमाणात रोवणीची कामे खोळंबली आहेत. तर काही बड्या विक्रेत्यांनी युरियाची कृत्रिम टंचाई निर्माण केली असून ते २६६ रुपयांच्या युरियाची ३५० रुपयांना विक्री करीत असल्याच्या तक्रारीत सुध्दा वाढ झाली आहे.यंदा पावसाने ओढ दिल्याने आधीच संकटात असलेले शेतकरी युरियाच्या टंचाईमुळे अधिक अडचणीत आणले आहे. शेतकºयांच्या समस्येची दखल घेवून मागील तीन चार दिवसांपासून लोकमतने हा विषय लावून धरला होता.युरियाचा कसा काळाबाजार केला जात आहे ही बाब सुध्दा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर जिल्हाधिकारी आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने याची गांर्भियाने दखल घेतली. तसेच जिल्ह्यात निर्माण झालेली युरियाची कोंडी फोडण्यासाठी तातडीने संबंधित कंपन्याना पुरवठा करण्यास सांगितले. शुक्रवारी कृभंको कंपनीच्या १४०० मेट्रीक टन तर शनिवारी इफको कंपनीचा १२०० मेट्रीक टन युरियाची जिल्ह्यात रॅक लागणार आहे.त्यानंतर पुन्हा दोन दिवसांनी दीड हजार मेट्रीक टन युरियाची रॅक लागणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील युरियाची पूर्णपणे टंचाई दूर होणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.जिल्हा प्रशासन, कृषी विभाग अॅक्शन मोडवरजिल्ह्यात खताचा काळाबाजार होवू नये तसेच अतिरिक्त दराने शेतकऱ्यांना खताची विक्री होवू नये यासाठी जिल्हा प्रशासन आणि कृषी विभाग आता अॅक्शन मोडवर आले आहे. युरियाचा काळाबाजार करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मोहीम सुरू केली आहे. याच अंतर्गत आता वितरकांच्या गोदामांची सुध्दा तपासणी केली जाणार असल्याची माहिती आहे.जिल्ह्यात शनिवारपर्यंत २६०० मेट्रिक टन युरिया येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कृषी विभागाने आणखी ३५०० मेट्रिक टन युरियाची मागणी केली आहे. आता शेतकऱ्यांची कोंडी होणार नसून टंचाई पूर्णपणे दूर होईल. खताचा काळाबाजार करणाºया विक्रेत्यांवर कठोर कारवाई केली जाईल.- गणेश घोरपडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.
युरियाची कोंडी अखेर सुटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 5:00 AM
जिल्ह्यात यंदा सर्वाधिक १ लाख ८९ हजार हेक्टरवर खरिपातील धानाची लागवड करण्यात येणार आहे. सध्या स्थितीत जिल्ह्यातील ४० टक्के रोवण्या आटोपल्या आहेत. ६० टक्के रोवण्या शिल्लक आहे. धानाच्या रोवणी दरम्यान शेतकऱ्यांना सर्वाधिक युरियाची गरज असते. मात्र जिल्ह्यात मागील आठ ते दहा दिवसांपासून युरियाची टंचाई निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना युरिया मिळत नसल्याने काही प्रमाणात रोवणीची कामे खोळंबली आहेत.
ठळक मुद्देदोन दिवसात येणार २६०० मेट्रिक टन युरिया : शेतकऱ्यांना दिलासा