डोळेझाक : सवलतींचा गैरफायदारावणवाडी : शेतीच्या नावावर ट्रॅक्टर घेऊन त्याचा वापर भाडेतत्वावर करीत नफा कमविणाऱ्यांची संख्या चांगलीच वाढली आहे. या ट्रॅक्टरमुळे शासनाच्या महसूलाला मोठा फटका बसत आहे. शेतीच्या नावावर सवलतीत ट्रॅक्टर घेऊन मलाई खाण्याच्या प्रकाराकडे संबंधित विभाग मात्र डोळेझाक करीत आहे. शेतकऱ्यांना शेतीच्या उपयोगासाठी ट्रॅक्टर घेण्याकरिता शासनाकडून विशिष्ट प्रमाणात सूट दिली जाते. शेतकऱ्यांनी घेतलेल्या या ट्रॅक्टरचा वापर केवळ कृषीसंबंधी कामाकरिता करावा असा करार देखील ट्रॅक्टर घेताना करवून घेतला जातो. शिवाय उपप्रादेशिक परिवहन विभाग देखील या ट्रॅक्टरला परवाना देताना त्याचा वापर शेती उपयोगाकरिता होईल, असे दिशानिर्देश देऊन कराची आकारणी करीत असते. मात्र आजच्या घडीला तालुक्यात शेतीच्या नावावर ट्रॅक्टर घेऊन त्याचा वापर विविध व्यवसायाकरिता करणे सुरू आहे. यातून शासनाला करापोटी मिळणारा लाखो रुपयांचा महसूल मात्र बुडत आहे.शासनाकडून शेतकऱ्यान्ाां आधुनिक साधनांचा वापर करून कृषी उत्पादनात वाढ करण्यासाठी ट्रॅक्टर खरेदीवर सवलत दिली जाते. त्या सवलतीचा पूर्णपणे दुरूपयोग होत आहे. ज्या शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचा वापर शेती आणि व्यवसायाकरिता करायचा आहे, असा शेतकऱ्यांनी उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे नोंदणी करून ट्रॅक्टर ट्रॉलीवर दोन परवाना क्रमांक लिहावे लागतात. तेव्हाच या ट्रॅक्टर चालकांना कृषी अणि व्यवसायाकरिता ट्रॅक्टरचा वापर करता येतो. हे दोन क्रमांक नसतील तर ट्रॅक्टर चालक मालकांवर कारवाई करून ट्रॅक्टर देखील जप्त करण्याची तरतूद आहे. परंतु अशी कारवाई एकही झाली नाही. (वार्ताहर)
शेतीच्या ट्रॅक्टरचा इतर कामात वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2015 1:27 AM