गोंदिया : जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी तसेच मूलद्रव्याची परिणामकारकता वाढविण्यासाठी जैविक खते,सेंद्रिय खते, गांडूळ खते व हिरवळीच्या खतांचा वापर करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन देवरीचे उपविभागीय कृषी अधिकारी मंगेश वावधने यांनी केले.
कृषी संजीवनी मोहिमेंतर्गत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी कृषी पध्दतीत रासायनिक खताच्या अनिर्बंधित वापरामुळे व अन्य कारणामुळे या जमिनीचे आरोग्य बिघडत चालले आहे. त्याचा पीक उत्पादनावर विपरीत परिणाम होऊ लागला आहे. जमिनीचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी मृद तपासणीवर आधारित खताच्या संतुलित तसेच परिणामकारक वापरास अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. याचा उद्देश रासायनिक खताचा अनिर्बंध वापर कमी करून मृद तपासणीवर आधारित अन्नद्रव्याच्या कमतरतेनुसार खताचा संतुलित व कार्यक्षम वापरास प्रोत्साहन देणे असा आहे. मृद आरोग्य सुधारण्यासाठी तसेच अन्नद्रव्याची कार्यक्षमता वाढविण्यासाठी जैविक खते,गांडूळ खते, युरिया ब्रिकेट्स खताचा वापरास प्रोत्साहन देणे.