लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंते व कंत्राटदाराच्या संगनमताने नवेगावबांध-चिचगड राज्य महामार्ग क्रं.२७७ वरील कोहलगाव फाटा ते तिडका फाटा दरम्यान मुरुमाऐवजी भिसीचा वापर करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली आहे. रस्ता कामात डांंबराचे प्रमाण कमी असल्याचेही सांगण्यात येते. या रस्ता बांधकामाची चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे.चिचगड ते अड्याळ राज्य महामार्ग क्रं.२७७ हा अर्जुनी-मोरगाव तालुक्यातून जातो. या महामार्गावर डांबरीकरण व मुरुमाने रस्त्याच्या कडा भरण्याचे काम नुकतेच सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या देखरेखीखाली करण्यात आले. हे काम वडसा येथील एका कन्स्ट्रक्शन कंपनीमार्फत करण्यात आल्याची माहिती आहे. रस्ता डांबरीकरणाच्या कामात आवश्यक त्या डांबराच्या प्रमाणापेक्षा कमी वापर करण्यात आल्याची ओरड आहे. मुरुमाऐवजी चक्क भिसीचा वापर करण्यात आला आहे. काही सुज्ञ नागरिकांनी उपविभागीय अभियंता सोनूने यांना त्याचवेळी भ्रमणध्वनीवरुन ही बाब सांगीतली होती. मात्र त्यांनी याकडे कानाडोळा केला.या प्रकारामुळे कंत्राटदाराने तक्रारकर्त्याना न जुमानता बिनबोभाटपणे काम सुरुच ठेवले. स्थानिक अभियंत्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली असतांनाही दखल घेतली जात नाही म्हणून बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे या रस्ता बांधकामाची तक्रार ग्रामस्थांना करावी लागली. तक्रारकर्त्याने शाखा अभियंता शहारे यांचेकडे यासंदर्भात विचारणा केली असता तुमच्या भागात मुरुम मिळतो काय? त्यामुळे भिसीचा वापर करण्यात आल्याचे उत्तर देऊन एकप्रकारे कंत्राटदाराची पाठराखणच केली आहे. या परिसरात मुरुम मिळत नाही म्हणून भिसीचे दर अंदाजपत्रकात नमूद करण्यात आले आहेत काय? हा महत्वाचा प्रश्न आहे. रस्त्याचा कडा बुजवितांना जेव्हा भिसीचा वापर करण्यात आला.त्यावेळी विभागाच्या उपविभागीय अभियंता व शाखा अभियंत्याची देखरेखीची जवाबदारी असते किंवा नाही? त्यावेळी मनाई का करण्यात आली हे प्रश्न अनुत्तरीत आहेत. कोणतेही बांधकाम करण्यापूर्वी साहित्याची तपासणी करुन अंदाजपत्रकात अंतरावरुन त्या साहित्याचे दर ठरविले जातात. मग हा मुरुम निर्धारीत ठिकाणावरुन आणला गेला का? जर आणला गेला असेल तर मुरुमाऐवजी भिसी कशी आणली? गुणवत्ता तपासणीची अभियंत्याची जबाबदारी नाही का? या प्रश्नांचा उलगडा अद्याप होऊ शकला नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या रस्त्याची चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
रस्ता बांधकामात मुरुमाऐवजी भिसीचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 9:10 PM
सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंते व कंत्राटदाराच्या संगनमताने नवेगावबांध-चिचगड राज्य महामार्ग क्रं.२७७ वरील कोहलगाव फाटा ते तिडका फाटा दरम्यान मुरुमाऐवजी भिसीचा वापर करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली आहे.
ठळक मुद्देचौकशीची मागणी : कंत्राटदार व अभियंत्यांचे संगनमत