गोंदिया : शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या गोंदिया नगर परिषद क्षेत्रातील कुडवा, गोंदिया व गोंदिया खुर्द या तीन ठिकाणच्या जमिनीला अकृषक दाखविण्यासाठी आरोपींनी नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी यांची बनावट सही व शिक्का करून त्याचा गैरवापर केला. या प्रकरणात गोंदिया शहर पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१८ फेब्रुवारी २०२० ते ३० जून २०२० या कालावधीत एका आरोपीने कुडवा येथील गट नंबर ७०४/२ पैकी २२२.९६ चौ.मी. या मिळकतीचे, दुसऱ्या आरोपीने गोंदिया बु. येथील गट नंबर १३५/३५ पैकी १११.५० चौ.मी. या मिळकतीचे व तिसऱ्या आरोपीने गोंदिया खुर्द येथील गट नंबर २८१/१० पैकी ३४२.५० चौ.मी. या मिळकतीचे गुंठेवारी नियमाकुल होऊन अकृषक करण्यासाठी नगर परिषद कार्यालय गोंदिया येथील महाराष्ट्र गुंठेवारी विकास नियमाधीन करणे, श्रेणीवाढ व नियंत्रण अधिनियम २००१ अंतर्गत नियमाधीन करण्यासाठी बनावट आदेश तयार करून त्यावर तत्कालीन मुख्याधिकरी चंदन पाटील यांच्या बनावट शिक्के व खोट्या सह्या करून त्या आदेश दस्ताऐवजाचे बनावटीकरण केले. ते बनावट दस्ताऐवज आदेश अपर तहसील कार्यालय गोंदिया येथे मिळकतीच्या अकृषक आकारणीकरिता वापरून शासनाची फसवणूक केली. रचना नगर परिषद कार्यालय गोंदियाचे नगर रचना सहायक सौरभ विनायक कावळे (वय २९) यांच्या तक्रारीवरून आरोपीवर गोंदिया शहर पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ४२०,४६५,४६८,४७१ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक महेश बनसोडे करीत आहेत.