बोंडगावदेवी : कमीत कमी खर्च जास्तीत जास्त उत्पादन हे तंत्र शेतकरी बांधवांनी अवलंबवावे. उत्पादन खर्च कमी करून आर्थिक उन्नती साधण्याचे कसब अवगत करणे गरजेचे आहे. आधुनिक व कमी खर्चाच्या तंत्रज्ञानाचा वापर करून धानाचे उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन आ. मनोहर चंद्रिकापुरे यांनी केले.
तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने कृषी संजीवनी मोहिमेअंतर्गत आयोजित शेतकरी प्रशिक्षणात ते बोलत होते. सिरेगावबांध येथील बुद्ध विहारात घेण्यात आलेल्या शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. मनोहर चंद्रिकापुरे होते. याप्रसंगी हेमकृष्ण संग्रामेे, बाजार समितीचे मुख्य प्रशासक लोकपाल गहाणे, जिल्हा सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष प्रमोद लांजेवार, कृषी सल्लागार समिती अध्यक्ष रतीराम राणे, एफ.आर.टी. शहा प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कृषीविषयक मार्गदर्शक म्हणून उपविभागीय कृषी अधिकारी भिमाशंकर पाटील, तालुका कृषी अधिकारी रवींद्र लांजेवार, प्रयोगशील शेतकरी देवेंद्र राऊत, अशोक पाटणकर उपस्थित होते. उपस्थित शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करताना आ. चंद्रिकापुरे म्हणाले की, कर्जबाजारातून मुक्त होऊन आर्थिक संपन्न होण्यासाठी पीक बदल करून विक्री व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. कार्यक्रमाप्रसंगी एमआरइजीएस अंतर्गत फळबाग लागवडीसाठी हेमकृष्ण संग्रामे, योगेश्वर गहाणे, प्रेमदास हातझाडे, अशोक संग्रामे या शेतकऱ्यांना मंजुरी पत्रक देण्यात आली. पीक स्पर्धा विजेते शेतकरी हरभरा पीक टेनीराम हातझाडे, मनोहर गोटेफोडे भिवखिडकी, यादोराव गोटे इटखेडा, आबाजी किरसान बोळदे, हंसराज औरासे रामपुरी, कतीराम आचल परसटोला यांचा आ. चंद्रिकापुरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
.........
शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचे वाटप
कृषी यांत्रिकीकरण अभियान २०२०-२१ अंतर्गत अशोक संग्रामे यांना ट्रॅक्टर स्वाधीन करण्यात आले. तालुक्यात सर्वाधिक २१.३५ हेक्टर आर. क्षेत्रावर फळझाडे लागवड करण्याचा उच्चांक करणारे महागाव साझ्याचे कृषी सहायक नरेश बोरकर यांनासुद्धा पुरस्कृत करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विलास कोहाडे यांनी केले. प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी रवींद्र लांजेवार यांनी केले. उपस्थितांचे आभार कृषी पर्यवेक्षक प्रकाश मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मंडळ कृषी अधिकारी कुमुदिनी बोरकर, कृषी पर्यवेक्षक राजेश संग्रामे, कृषी सहायक प्रकाश वासनिक यांनी सहकार्य केले.