तिरोडा : बदलत्या वातावरणाचा प्रतिकूल परिणाम शेतीवर होत आहे. त्याच त्याच पिकांची लागवड केल्यामुळे उत्पादनात सुद्धा घट होत आहे. तर जमिनीची सुपीकतासुद्धा खालावत चालली आहे. यासाठी शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल करून आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेती केल्यास उत्पादन वाढीसाठी त्याचा निश्चितच फायदा होईल, असे मार्गदर्शन मंडळ कृषी अधिकारी पी.पी. खंडाईत यांनी केले.
कृषी संजीवनी मोहिमेंतर्गत तिरोडा तालुक्यातील पांजरा येथे आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच राजेंद्र चामट हे होते. यावेळी ग्रामपंचायत सदस्य हिराकुमार गोमासे, छाया पटले, सुनीता वाळूलकर, आत्माचे सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक अरविंद उपवंशी, उमेश सोनेवाने, जी. के. चौधरी, एल.के. रहांगडाले, एस.जी. चव्हाण उपस्थित होते. कृषी संजीवनी मोहिमेंतर्गत शेतकऱ्यांना रासायनिक खतांचा समतोल वापर, गांडूळ खत, हिरवळीचे खत, ॲझोला, जीवामृत, सेंद्रिय खते यांचा वापर करणे तसेच युरिया ब्रिकेट्सचा वापर यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन एल. के. रहांगडाले केसालवाडा यांनी केले, तर आभार घनश्याम चौधरी यांनी मानले.