बाराभाटी : गेल्या तब्बल एक वर्षापासून सर्व जगात कोरोनाचे थैमान सुरू आहे. यावर भारताने आधी लस काढून कोरोनाला हरविण्याचे कार्य हाती घेतले आहे. यालाच आपण समोर घेऊन जाण्यासाठी सर्व वयोगटातील नागरिकांनी मनात कुठलीही भीती न बाळगता कोरोना लस टोचून घ्यावी, असे प्रतिपादन वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनेश बारसागडे यांनी केले.
कोरोनाची लस घेणे आवश्यक आहे, कारण अजून कोरोनाचा प्रकोप संपलेला नाही. कोरोनाचा चढता-उतरता क्रम सुरूच आहे. कोरंभीटोला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज शंभराहून अधिक नागरिक लस घेत आहेत. वय ४५ च्या वर नागरिकांचा कल लसीकरणाकडे वाढत आहे ही उत्तम गोष्ट आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ८ व १० मार्च रोजी लस देण्यात आली असून, दोन दिवसांत प्रत्येकी १०० नागरिकांना लस देण्यात आली. डॉ. बारसागडे यांनी नागरिकांमध्ये कोरोना लस घेण्याबाबतची भीती निघून जावी यासाठी स्वतः लस घेतली. लसीकरणासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. कवीश्वर किरसान, मधुकर कामथे, संघरत्न गोसावी, मंजुषा बहेकर, पवन आटोळे, नितीन राठोड, शीला भैसारे, पूनम वासनिक, रंजना मेश्राम, सार्वे, उमेश बोरकर, लेंडे, वर्षा मेश्राम, रज्जू जांभुळकर, प्रतिमा शहारे, प्रतिमा राऊत, राधिका स्वर्णकार यांनी सहकार्य केले.