गोंदिया : अवघ्या जगाला हेलावून सोडणाऱ्या कोरोनाला मूठमाती देण्यासाठी भारतात तयार करण्यात आलेल्या लसींचे शनिवारी (दि.१६) फ्रंटलाइन कोरोना वॉरियर्सला लसीकरण करण्यात आले. जिल्ह्यात २१३ वॉरियर्सला लस टोचण्यात आली असून, काहीच दुष्परिणाम जाणवले नसल्याचे काहींनी ‘लोकमत’ला सांगितले. एवढेच नव्हे तर त्यांनी लसीबाबत कुठलीही शंका न बाळगता प्रत्येकाने ही लस घेऊन कोरोनाविरोधाच्या या लढ्यात शासनाला सहकार्य करावा, असा संदेशही ‘लोकमत’च्या माध्यमातून नागरिकांसाठी दिला.
काहीच त्रास नाही ()
मी कोरोनाची लस घेतली असून, इंजेक्शनच्या जागी थोडेपार दुखत आहे, त्याशिवाय काहीच त्रास जाणवलेला नाही. यामुळे लसीबाबत नागरिकांनी आपल्या मनात कुठल्याची प्रकारच्या शंका न बाळगता लस घेऊन कोरोनाला संपविण्यासाठी शासनाला सहकार्य करावे.
- डॉ.नितीन कापसे
जिल्हा आरोग्य अधिकारी, गोंदिया
मी स्वस्थ आहे ()
सकाळी ११.२३ वाजता कोरोनाची लस घेतल्यानंतर मला काहीच त्रास जाणवला नाही. मी स्वस्थ असून माझी कामे नियमितपणे करीत आहे. त्यामुळे प्रत्येकाने लस घेऊन कोरोनाला संपविण्यात शासनाला सहकार्य करावे.
- डॉ. नितीन गाडेकर. गोंदिया.
लसीचे दुष्परिणाम नाहीच ()
सकाळी ११ वाजेदरम्यान लस घेतल्यानंतर मी नियमित आपले काम करीत आहे. भारतात निर्मित लस सुरक्षित असून नागरिकांनी शंका बाळगू नये व अफवांवर विश्वास ठेवू नये. प्रत्येकाने ही लस घ्यावी.
- डॉ. नितीन काटोले, गोंदिया.
इंजेक्शनच्या जागेवर दुखते ()
सकाळी ११.३० वाजता इंजेक्शन घेतल्यानंतर अर्धा तास तेथे होतो. त्यानंतर मी माझी ड्यूटीही केली व मला काहीच दुष्परिणाम जाणवले नाही. फक्त इंजेक्शनच्या जागेवर साधारण दुखणे असून अन्य काहीच त्रास नाही. ही लस सुरक्षित असून न घाबरता प्रत्येकाने लस घेऊन सुरक्षित रहावे.
डॉ. प्रशांत तूरकर, गोंदिया.
भीती बाळगू नका ()
दुपारी १२.३० वाजेदरम्यान मी लस घेतल्यानंतर दररोजप्रमाणे आपली कामे आटोपली. मला काहीच त्रास जाणवला नसून मी अगदी स्वस्थ आहे. त्यामुळे भीती न बाळगता प्रत्येकाने लस घ्यावी.
- कल्याण चौधरी, आरोग्य सेविका
लसीचे दुष्परिणाम नाही ()
लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी मी ही लस घेतली असून त्यानंतर आतापर्यंत मला काहीच त्रास जाणवलेला नाही. मी दररोजप्रमाणे आपले काम करतोय. नागरिकांनी लसीबद्दल मनात भीती बाळगू नये. थोडेफार त्रास जाणवले तरीही त्यात घाबरण्याची गरज नाही.
- अनिरूद्ध शर्मा, सांख्यिकी सहायक