गोंदिया : कोरोनाला मात देण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण हाच एकमेव उपाय असल्याने अवघ्या देशात लसीकरणाची चळवळच सुरू आहे. विशेष म्हणजे, सुरुवातीला १८-४४ वयोगटाच्या लसीकरणास परवानगी नव्हती. मात्र, २१ जूनपासून या गटाचेही लसीकरण सुरू झाले आहे. अशात लसीकरणाच्या सुरुवातीपासून जिल्ह्यात सोमवारपर्यंत (दि.१९) या गटातील १४७९८४ तरुण-युवकांनी लस घेतली असून त्यांची २३.६८ एवढी टक्केवारी आहे.
कोरोनापासून बचावासाठी लस हाती येताच १६ जानेवारीपासून देशात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. यामध्ये सुरुवातीला आरोग्य कर्मचारी, फ्रँटलाईन वर्कर्स, ४५-६० तसेच ६० प्लस गटाच्या लसीकरणाला सुरुवात करण्यात आली होती, तर कोरोनाची दुसरी लाट सुरू असतानाच एप्रिल महिन्यात १८-४४ गटातील लसीकरणाला परवानगी देण्यात आली होती. मात्र, काही दिवसांतच त्यावर बंदी लावण्यात आली होती. यामुळे १६ जानेवारी ते २१ जूनपर्यंत जिल्ह्यात ३६०५५५ नागरिकांचे लसीकरण झाले होते. यामध्ये २७६७९५ नागरिकांनी पहिला डोस, तर ८३७६० नागरिकांनी दुसरा डोस घेतला होता. यामध्ये १८-४४ गटात १८०४९ तरुणांनी लस घेतली होती. यात १२५९९ तरुणांनी पहिला, तर ५४५० तरुणांनी दुसरा डोस घेतला होता.
त्यानंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याने केंद्र शासनाने २१ जूनपासून १८-४४ गटाच्या लसीकरणालाही परवानगी दिली होती. त्यानुसार जिल्ह्यात २२ जूनपासून या गटाच्या लसीकरणाला सुरुवात झाली. या २१ जून ते १९ जुलै या कालावधीत जिल्ह्यातील ५३९१३८ नागरिकांचे लसीकरण झाले असून यामध्ये ४३१४१२ नागरिकांनी पहिला, तर १०७७२६ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. यात १८-४४ गटातील १२९९३५ तरुणांचा समावेश असून यातील १२५४०७ तरुणांनी पहिला, तर ४५२८ तरुणांनी दुसरा डोस घेतला आहे.
-----------------------------
लसीकरणात तरुणाई दुसऱ्या क्रमांकावर
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने चांगलाच कहर केल्याने मे महिन्यात १८-४४ गटाच्या लसीकरणाला सुरुवात झाली होती. तेव्हा ऑनलाइन रजिस्ट्रेशन झालेल्यांनाच लस देण्यात आली होती. मात्र, काही दिवसांतच हे लसीकरण बंद पडले. त्यानंतर या गटाच्या लसीकरणाची मागणी जोर धरू लागल्याने २२ जूनपासून पुन्हा लसीकरणाला सुरुवात झाली. त्यानंतर सोमवारपर्यंत (दि.१९) या गटातील १४७९८४ तरुणांनी लस घेतली आहे. यामध्ये १३८००६ तरुणांनी पहिला डोस, तर ९९७८ तरुणांनी दुसरा डोस घेतला. हा गट लसीकरणात आता दुसऱ्या क्रमांकावर आहे.
----------------------------------
७५७८ नागरिकांनी मोजले पैसे
लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर शासकीय लसीकरण केंद्रांवर गर्दी होऊ नये म्हणून गोंदियातील ५ व तिरोडा येथील १ अशा एकूण ६ खासगी हॉस्पिटल्सला लस उपलब्ध करवून देण्यात आल्या होत्या. मात्र, यासाठी नागरिकांना प्रती डोस २५० रुपये मोजावे लागत होते. अशात जिल्ह्यातील ७५७८ नागरिकांनी पैसे मोजून लसींचा डोस घेतला आहे. मात्र, शासनाने सर्वांना मोफत लस देण्याची घोषणा केल्यानंतर आता या खासगी हॉस्पीिटल्समध्ये लसीकरण बंद करण्यात आले आहे.
----------------------------------
गर्भवती, स्तनदा व तृतीयपंथी लसीकरणापासून दूर
जिल्ह्यातील लसीकरणासाठी आकडेवारी ५ लाखांचा आकडा पार करीत असतानाच व लसीकरणाला ६ महिने उलटून गेले असतानाही जिल्ह्यातील एकही गर्भवती, स्तनदा व तृतीयपंथीयांनी लस घेतली नसल्याची माहिती आहे. यावरून लसीकरणाला घेऊन आजही नागरिकांत भीती व संभ्रम असल्याचे दिसून येत आहे.
---------------------------
जिल्ह्यातील लसीकरणाचा तक्ता
गट पहिला डोस दुसरा डोस
आरोग्य कर्मचारी १०२८० ६१३४
फ्रंटलाईन वर्कर्स २४३१२ १२६२०
१८-४४ १३८००६ ९९७८
४५-६० १६७५७० ४७०३६
६० प्लस ९१२४४ ३१९५८
एकूण ४३१४१२ १०७७२६