गोंदिया : कोरोना लसीकरण अवघ्या देशातच जोमात सुरू असून, आता शासनाने ६० वर्षांवरील वयोगटातील व्यक्तींसाठी लसीकरण सुरू केले आहे. सोमवारपासून (दि. १) या लसीकरणाला सुरुवात झाली असून, त्याअंतर्गत शहरातील ५ खाजगी हॉस्पिटलमध्येही लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. या हॉस्पिटलमध्ये मंगळवारपासून (दि. २) वरिष्ठ नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे.
१६ जानेवारीपासून अवघ्या देशातच कोरोना लसीकरण कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. तर त्याला महिना लोटला असल्याने आता दुसरा डोसही दिला जात आहे. अशात लसीकरणाला वेग यावा व कमीतकमी कालावधीत जास्तीतजास्त नागरिकांचे लसीकरण करता यावे यासाठी शासनाने ६० वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील वरिष्ठ नागरिकांसाठीही लसीकरणाचा कार्यक्रम सुरू केला आहे. मात्र शासकीय केंद्रांमधूनच लसीकरण सुरू राहिल्यास लसीकरणाला वेळ लागणार आहे. ही बाब लक्षात घेत शासनाने महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत नोंदणीकृत खाजगी हॉस्पिटल्समधूनही लसीकरण करण्याची योजना आखली आहे.
त्यानुसार, सोमवारपासून (दि. १ मार्च) वरिष्ठ नागरिकांच्या लसीकरणासाठी महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत नोंदणीकृत असलेल्या शहरातील ५ खाजगी हॉस्पिटल्समध्येही लस उपलब्ध करवून दिली आहे. यात, सोमवारी काही तांत्रिक अडचणींमुळे या खाजगी हॉस्पिटल्समध्ये लसीकरण करता आले नाही. मात्र मंगळवारपासून (दि. २ मार्च) या खाजगी हॉस्पिटल्समध्येही लसीकरणाला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे, ज्या नागरिकांना शासकीय रुग्णालयात जाऊन लस घ्यावयाची नाही अशांसाठी ही पाच खाजगी हॉस्पिटल्स पर्याय ठरणार आहेत. शिवाय यामुळे आता लसीकरणालाही वेग येऊन जास्तीतजास्त लोकांचे लसीकरण करता येणार आहे.
--------------------------------
जिल्ह्यात आतापर्यंत १५,९०२ जणांचे लसीकरण
जिल्ह्यात आतापर्यंत १५,९०२ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. यामध्ये ६,९१८ आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला डोस तर २,२८८ आरोग्य कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. तसेच ६,३७९ फ्रंटलाइन वर्कर्सला पहिला डोस तर १५० फ्रंटलाइन वर्कर्सला दुसरा डोस देण्यात आला आहे. याशिवाय शासनाच्या आदेशानुसार, सोमवारपासून (दि. १ मार्च) वरिष्ठ नागरिकांचे लसीकरण सुरू झाले आहे. यामध्ये १६७ वरिष्ठ नागरिकांना पहिला डोस देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, वरिष्ठ नागरिकांच्या लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी शासकीय लसीकरण केंद्रांतून १६५ वरिष्ठ नागरिकांना लस देण्यात आली आहे. यात ९१ पुरुष असून ७४ महिला आहेत.
-------------------------
ही आहेत ५ खाजगी हॉस्पिटल्स
वरिष्ठ नागरिकांच्या लसीकरणासाठी शासनाच्या महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत नोंदणीकृत पाच खाजगी हॉस्पिटल्समध्येही लस उपलब्ध करवून देण्यात आली आहे. यामध्ये बालाजी नर्सिंग होम, डॉ. बाहेकर हॉस्पिटल, डॉ. ब्राम्हणकर हॉस्पिटल, राधाकृष्ण हॉस्पिटल व न्यू गोंदिया हॉस्पिटलचा समावेश आहे. या खाजगी रुग्णालयांमध्ये नागरिकांना २५० रुपये प्रति डोसनुसार पैसे द्यावे लागणार आहेत.
------------------------
या ॲपद्वारे करा आपले रजिस्ट्रेशन
लसीकरण मोहिमेंतर्गत आता नागरिकांना कोविन.जीओव्ही.इन या संकेतस्थळावरून आपल्या नावाची नोंदणी करता येणार आहे. शिवाय यामध्ये नागरिकांना शासकीय किंवा खाजगी हॉस्पिटल निवडण्याचीही सुविधा दिली गेली आहे. यामुळे आता नागरिकांनी या ॲपवरून आपले रजिस्ट्रेशन करून लसीकरण करवून घ्यावे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे यांनी कळविले आहे.