गोंदिया : कोरोना लसीकरण जोमात सुरू असतानाच आता लसींचा तुटवडा जाणवत आहे. परिणामी पाहिजे त्या प्रमाणात डोस मिळत नसल्याचे दिसत आहे. अशात शुक्रवारी (दि.९) जिल्ह्याला कोव्हॅक्सिनचे ९९२० डोस मिळाले होते. त्यातील ७५९५ डोसेस शनिवारी व रविवारी नागरिकांना देण्यात आले आहेत तर उरलेले २३२५ डोस सोमवारी वापरल्यानंतर आता आणखी डोसेसची गरज पडणार आहे.
कोरोनावर सध्या लस हाच एकमात्र उपाय हाती असून लस घेऊन कोरोनाच्या तीव्रतेपासून बचाव करता येणार आहे. यामुळेच आता शासनाकडून जास्तीत जास्त लसीकरणावर जोर दिला जात आहे. मात्र, दुसरीकडे लसींचा तुटवडा निर्माण झाल्याने पाहिजे त्या प्रमाणात लस मिळत नसल्याचे चित्र आहे. परिणामी लसीकरणात अडचण येत आहे. जिल्ह्यात अशीच काहीशी स्थिती निर्माण झाली असून लसींची अत्यंत कमतरता जाणवत असून लसीकरणाला ‘ब्रेक’ लागला असता.
मात्र, शुक्रवारी (दि.९) जिल्ह्याला कोव्हॅक्सिनचे ९९२० डोस पाठविण्यात आले. या डोसेसचे वितरण करून शनिवारी (दि.१०) ४३२३ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले तर रविवारी (दि.११) ३२७२ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले म्हणजेच, दोन दिवसांत ७५९५ नागरिकांचे लसीकरण केल्यानंतर २३२५ डोस शिल्लक होते. त्यातून आता सोमवारी लसीकरण केल्यानंतर मात्र डोसेस संपणार आहेत. त्यामुळे मंगळवारी लसीकरणासाठी आणखी डोसेसची गरज पडणार आहे.
------------------------------------
लसींचा आणखी साठा मिळणार
जिल्ह्यातील लसींचा साठा सोमवारी संपणार असून लस न मिळाल्यास मंगळवारी लसीकरणाला ‘ब्रेक’ लागणार अशी स्थिती निर्माण झाली आहे. मात्र, सोमवारी सायंकाळपर्यंत लसींचा साठा मिळणार असून त्यामुळे लसीकरण अखंडितपणे सुरू राहणार आहे.
------------------------------
आतापर्यंत मिळाले दोन लाख डोस
१६ जानेवारीपासून अवघ्या देशात लसीकरणाला सुरुवात झाली आहे तेव्हापासून नियमितपणे जिल्ह्याला लसींचा पुरवठा केला जात असून आतापर्यंत जिल्ह्याला सुमारे २०८८६० डोस मिळाले आहेत. यामध्ये कोव्हॅक्सिन व कोव्हीशिल्ड या दोन्ही लसींचे डोस असून कोव्हीशिल्डचे यात जास्त डोस आहेत. आता सोमवारी सायंकाळपर्यंत आणखी डोस मिळणार असल्याची माहिती आहे.