गोंदिया : जिल्ह्यात गुरुवारपासून (दि. १) ४५ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील व्यक्तींच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. अशात लस घेणाऱ्यांची संख्या वाढणार असून गैरसोय होऊ नये ही बाब लक्षात घेत आरोग्य विभागाने आता जिल्ह्यातील आरोग्य उपकेंद्रांवर ही लसीकरणाला सुरुवात केली आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील ७६ उपकेंद्रांवर लसीकरणाची सोय केली जाणार असून यात जिल्ह्यातील आठही तालुक्यातील उपकेंद्रांचा समावेश आहे.
लसीकरणांतर्गत आतापर्यंत ज्येष्ठ नागरिक तसेच ४५ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील व्यक्ती ज्यांना ठराविक आजार आहेत अशांचेच लसीकरण केले जात आहे. यासाठी आरोग्य विभागाने शासकीय रुग्णालय, आरोग्य केंद्र व काही खासगी रुग्णालयात लसीकरण सुरू केले होते. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढत चालला असून यासाठी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करणे हाच रामबाण उपाय असल्याने शासनाने लसीकरणावर जास्त जोर दिला आहे. यासाठी ४५ वर्षे वयोगटातील प्रत्येकच व्यक्तीला लस देण्याचा निर्णय घेण्यात आला असून गुरुवारपासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे.
मात्र एवढ्या मोठ्या संख्येत नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी लसीकरण केंद्रांवर गर्दी होणार व त्यामुळे आरोग्य यंत्रणेसह नागरिकांची गैरसोय होणार आहे. यामुळे याकडे लक्ष देत आरोग्य विभागाने लसीकरणासाठी केंद्रे वाढविण्याचे नियोजन केले व त्यानुसार जिल्ह्यातील आरोग्य उपकेंद्रांवर लसीकरणाची सोय करून दिली जाणार आहे. यासाठी ७६ उपकेंद्रांची निवड करण्यात आली असून जिल्ह्यातील प्रत्येकच तालुक्यातील उपकेंद्रांचा यात समावेश करण्यात आला आहे.
--------------------------
इतरत्र जाण्याची गरज पडणार नाही
आरोग्य विभागाने आता ७६ उपकेंद्रांमध्ये लसीकरणाची सोय करून दिली असल्याने नागरिकांना लसीकरणासाठी अन्य गावात असलेल्या आरोग्य केंद्रातही जाण्याची गरज पडणार नाही. विशेष म्हणजे, काही नागरिकांना अन्य गावातील आरोग्य केंद्रात जाणे अडचणीचे ठरत असल्याचीही माहिती आहे. मात्र आता उपकेंद्रांत ही लसीकरण केले जाणार असल्याने अशांची सोय होणार आहे. शिवाय लसीकरणाचे प्रमाणही नक्कीच वाढणार. तसेच या उपकेंद्रांमध्ये आणखीही वाढ केली जाणार आहे.
--------------------------------------------
उपकेद्रांचा तालुकानिहाय तक्ता
तालुका- प्राथमिक आरोग्य केंद्र - उपकेंद्र
तिरोडा- ४- ८
आमगाव - ४- ८
सालेकसा -४- ८
देवरी - ४- ८
अर्जुनी-मोरगाव - ५- ९
सडक-अर्जुनी- ४- ८
गोंदिया - ९- १७
गोरेगाव- ५ - १०
-------------------------------
एकूण ३९- ७६