बिरसीफाटा : कोरोनाने सर्वत्र थैमान घातले असून याला प्रतिबंध लावण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लस प्रभावी उपाय आहे. सर्व वैज्ञानिक आणि तज्ज्ञांनी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लसीकरण केल्याने आपली आंतरिक शक्ती वाढेल आणि या युद्धात लढण्यास तयार होऊ म्हणून सर्वांनी लस घेऊन कोरोनाला हद्दपार करण्याचा संकल्प करावा, असे आरोग्य विभागाने कळविले आहे.
शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे तालुका वैद्यकीय अधिकारी व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. दिनेश मोटघरे यांनी कळविले. ते तिरोडा तालुक्यातील वडेगाव येथे कोरोना लसीकरण मोहिमेप्रसंगी बोलत होते. लसीकरणासाठी नोंदणीसाठी शासनाकडून प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात शिबिरांचे आयोजन केले जाणार असून यात नागरिकांची विशेषत: तरुणांची नोंदणी नि:शुल्क केली जाईल. लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी डाॅ. रुबी रीनाईत, डाॅ. तुळशी भगत, आरोग्यसेविका मेश्राम, लांडगे, बन्सोड, कोरोना तपासक बिसेन, औषधी वितरक तुमसरे, आशासेविका रेखा पटले, दीपा टेंभरे, कांता भेलावे, हंसकला भेलावे, अनिता बघेले, अश्विनी मेश्राम आदी सहकार्य करीत आहेत.