तिरोडा : संपूर्ण देशभरात शुक्रवारी कोविड लसीकरणाला प्रारंभ झाला. या अंतर्गत तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात आ.विजय रहांगडाले यांच्या उपस्थित सुरुवात करण्यात आली. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ.हिम्मत मेश्राम यांना पहिली लस देऊन लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली. दरम्यान, लसीकरणाला घेऊन आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला.
लसीकरण मोहीम आठवड्यातून तीन दिवस चालणार आहे. शनिवारी, मंगळवार आणि गुरुवारी या दिवशी प्रत्येकी १०० आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात येणार आहे. या कालावधीत चारशे आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात येणार आहे. यात आरोग्य कर्मचारी, उपजिल्हा रुग्णालयातील आणि तालुक्यातील आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तालुक्यातील २,७७२ डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.हिंमत मेश्राम यांनी सांगितले. ही लसीकरण मोहीम दोन महिने चालणार असल्याची माहिती आहे.