गोंदिया : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी राज्य सरकारने ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार, शनिवारपासून (दि.१९) जिल्ह्यातील सर्व उपजिल्हा आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच नगर परिषद क्षेत्रात ५ केंद्रांवर लसीकरणाला सुरुवात झाली आहे. रात्री उशिरा यासंदर्भातील राज्य शासनाचे निर्णय जाहीर झाला असून, गोंदिया तालुका व शहरातील सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे उपविभागीय अधिकारी वंदना संवरगपते यांनी कळविले आहे.
केंद्र सरकारने यापूर्वीच १८ प्लस वयोगटातील लाभार्थींचे लसीकरण २१ जूनपासून करण्याचे जाहीर केले आहे. आता कोविड लसीकरण हा एक महत्त्वाचा राष्ट्रीय कार्यक्रम घोषित केला असल्यामुळे लसीकरणाबाबत महत्त्वाची घोषणा महाराष्ट्र सरकारकडून शुक्रवारी करण्यात आली. १८ प्लस लसीकरण सुरू झाल्यावर एकदाच सर्व लाभार्थींचा गोंधळ होऊ नये म्हणून त्याआधी ३० प्लस लाभार्थींचे प्राधान्याने लसीकरण करून घेण्याचे आदेश आरोग्य संचालिका डॉ. अर्चना पाटील यांनी शुक्रवारी सायंकाळी व्हिडिओ कॉन्फरन्समधून सर्व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार शनिवारी (दि.१९) शहरात ५ उपकेंद्रांतून ३० प्लस नागरिकांना मोफत लस देण्यात येत आहे. विशेष म्हणजे, या लसीकरण सत्रास पूर्वनोंदणीची अट नसून ‘ऑन द स्पॉट’ नोंदणी करून सुलभ पद्धतीने लसीकरण खुले करण्यात आले आहे. याचा लाभ घेतला पाहिजे असे उपविभागीय अधिकारी वंदना संवरगपते, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वेदप्रकाश चौरागडे यांनी कळविले आहे.