गोंदिया : पुरवठा न झाल्याने जिल्ह्यात शुक्रवारी (दि.२) लसीकरण मोहीम खंडित झाली होती. मात्र सायंकाळी लसींचा साठा पुरविण्यात आल्याने शनिवारी (दि.३) जिल्ह्यात लसीकरण पूर्ववत सुरू झाले. यंदा जिल्ह्याला १५३०० कोविशिल्ड तर ११३०० कोव्हॅक्सिनचा पुरवठा करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांना आता पुन्हा लसीकरण करता येणार आहे.
कोरोना विरोधात सुरू असलेल्या लढ्यात १६ जानेवारीपासून देशात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. यांतर्गत वेगवेगळ्या वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण सुरू असून जिल्ह्यात २२ जूनपासून १८-४४ गटाच्या लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, आरोग्य विभागाच्या अंदाजानुसार या गटात सुमारे ६.२५ लाख तरुण व युवा असून त्यांना लसीकरणासाठी उत्सुकता होती. परिणामी लसीकरण सुरू होताच या गटातील तरुण लसीकरणासाठी सरसावल्याचे दिसत आहे.
यामुळे जिल्ह्यात लसीकरणाची आकडेवारी झपाट्याने वाढत असून बुधवारपासूनच लसींचा तुटवडा जाणवत होता. अशात बहुतांश केंद्रांचे लसीकरण बंद पडले होते व काही मोजक्या केंद्रांवरच लसीकरण करता आले. मात्र शुक्रवारी (दि.२) जिल्ह्यातील सर्वच केंद्रांवरील साठा संपल्याने लसीकरणाला ब्रेक लागला होता. अशात शुक्रवारी सायंकाळी जिल्ह्यातील १५३०० कोविशिल्ड व ११३०० कोव्हॅक्सिनचा पुरवठा करण्यात आला आहे. त्यामुळे शनिवारी पुन्हा एकदा लसीकरणाला सुरुवात झाली आहे.
------------------------
१८-४४ गटात लसीकरण जोमात
१८-४४ या गटाचे लसीकरण सुरू करण्यात यावे, अशी मागणी सुरुवातीपासूनच जोर धरत होती. तरुण व युवांचा हा गट असून त्यांना लसीकरणाला घेऊन उत्सुकता लागून होती. आता लसीकरण सुरू झाल्याने ते स्वत:ला सुरक्षित करून घेण्यासाठी सरसावले आहेत. यामुळेच या गटातील आकडेवारी झपाट्याने वाढताना दिसत आहे. मंगळवारी जिल्ह्यातील आकडेवारी बघता ७७६०५ तरुणांनी लसीकरण करवून घेतले होते.
----------------------------
लवकरात लवकर लस घ्या
कोरोनाची लस अत्यंत सुरक्षित कोरोनापासून बचाव करीत असल्याचे दुसऱ्या लाटेतील अभ्यासातून सिद्ध झाले आहे. त्यामुळे आता तरी नागरिकांनी मनातील भीती व संभ्रम बाजूला सारून लसीकरण करवून घेण्याची गरज आहे. जिल्ह्यात लसीकरण जोमात होत असूनही वास्तविक हे प्रमाण कमीच आहे. यामुळे नागरिकांनी वेळ वाया न घालविता आपले लसीकरण करवून घेण्याची गरज आहे.