कपिल केकत
गोंदिया : लसीकरणात सुरुवातीपासूनच अग्रेसर असलेल्या गोंदिया जिल्ह्याने आता १० लाखांचा आकडा पार केला आहे. शुक्रवारपर्यंत (दि.२४) जिल्ह्यातील तब्बल १०१९०९१ नागरिकांनी लस घेतली असून यानंतर आता जिल्ह्यातील लसीकरणाची आकडेवारी ९८.९० टक्के झाली आहे. येत्या १-२ दिवसांत जिल्ह्यात १०० टक्के लसीकरण होणार असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
अवघ्या देशात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. यामध्ये गोंदिया जिल्हा सुरुवातीपासूनच अग्रेसर राहिला असून सर्वाधिक लसीकरणात पुढे-पुढेच होता. लवकरात लवकर जिल्ह्यातील लसीकरण आटोपावे यासाठी जिल्हा प्रशासनाकडून धडपड सुरू होती व नागरिकांना लसीकरणात सोय व्हावी यासाठी सुमारे २०० केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. परिणामी नागरिकांना फार अंतरावर जाण्याची गरज नसून जवळच लस घेता येत आहे. शिवाय लसीकरण शिबिरांचे आयोजन करूनही नागरिकांची सोय करून दिली जात आहे. याचे फलीत असे की, शुक्रवारपर्यंत (दि.२४) जिल्ह्यातील १०१९०९१ नागरिकांचे लसीकरण झाले असून त्याची ९८.९० एवढी टक्केवारी आहे. यात ७२७३८० नागरिकांनी पहिला डोस घेतला असून त्याची ७०.५९ एवढी टक्केवारी आहे. तर २९१७११ नागरिकांनी दुसरा डोस घेतला असून त्याची २८.३१ एवढी टक्केवारी आहे. आताची ही आकडेवारी बघता येत्या १-२ दिवसांत जिल्हा १०० टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट गाठणार यात शंका वाटत नाही. असे झाल्यास गोंदिया राज्यातील पहिला जिल्हा पण ठरू शकतो.
--------------------------------------
१०३०४०० नागरिकांचे उद्दिष्ट
आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील १८ वर्षे वयोगटावरील १०३०४०० नागरिकांचे लसीकरण करावयाचे आहे. यामध्ये वयोगटानुसार वेगवेगळे गट ठरविण्यात आले आहेत. त्यानुसार, लसीकरण सुरू असून जिल्ह्याने शुक्रवारपर्यंत १०१९०९१ नागरिकांचे लसीकरण केले आहे. म्हणजेच आता ११३०९ नागरिकांचे लसीकरण उरले आहे. या नागरिकांनी सहकार्य करून अगोदर लस घेण्याची गरज आहे. जेणेकरून ते सुरक्षित होतील व जिल्हा सुद्धा पूर्ण लसीकरण सुरक्षित होणार.
-----------------------------
टेन्शन फक्त दुसऱ्या डोसवाल्यांचे
लसीकरणातील जिल्हा प्रशासनाची कामगिरी व त्याला मिळालेले जिल्हावासीयांचे सहकार्य दोन्ही बाजू कौतुकास्पद आहेत. यामुळेच जिल्ह्याने लसीकरणाचा एवढा मोठा टप्पा गाठला आहे; मात्र दुसरा डोस घेणाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाचे टेन्शन वाढविले आहे. जिल्ह्यात ७०.५९ टक्के नागरिकांनी पहिला डोस घेतला असतानाच मात्र फक्त २८.३१ टक्के नागरिकांनीच दुसरा डोस घेतला आहे. कोरोनापासून संपूर्ण सुरक्षेसाठी लसीचे दोन्ही डोस घेणे गरजेचे आहे. आता ही बाब दुसरा डोस टोलवणाऱ्या नागरिकांनी समजून घेण्याची गरज आहे.