गोंदिया : कोरोनामुळे लोकांचे लसीकरण लांबत आहे, तर दुसरीकडे जनावरांचेही लसीकरण होताना दिसत नाही. गोंदिया जिल्ह्यातील ११ लाख ७८ हजार ५९५ जनावरांचे लसीकरण जून महिन्यात होणार आहे. यामुळे तोंडखुरी, गायखुरी, घटसर्प, एकटांग्या यासारख्या आजारापासून जनावरांची मुक्तता होऊ शकेल. विशेष म्हणजे सहा महिन्यांपूर्वी नोव्हेंबर महिन्यात जनावरांचे लसीकरण पार पडले होते. गोंदिया जिल्ह्यात पशुधनाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यात संकरित गायी २२ हजार १६९, गावठी गायी ३ लाख १३ हजार ४२४, म्हैस ८८ हजार ५३, शेळ्या १ लाख ५५ हजार ५६६, मेंढ्या २५७९, कोंबड्या ८ लाख ८१ हजार २४९, डुकरे १३०८, घोडे/गाढव ६९, कुत्रे १२ हजार १७८ असे एकूण ११ लाख ७८ हजार ५९५ जनावरे आहेत.
पावसाळ्यानंतर दरवर्षी जनावरांना विविध आजारांची लागण होत असते. लाळखुरकतयुक्त हा विषाणूजन्य आजार असून, या रोगाच्या प्रादुर्भावामुळे जनावरे बाधित होण्याचे प्रमाण ९० ते ९५ टक्के असते. त्यामुळे पशुधनाचे नुकसान टाळण्यासाठी सर्व पशुधनाला लसीकरण केले जाते. हे लसीकरण दरवर्षी करण्यात येते. मागील नोव्हेंबर महिन्यात लसीकरण मोहीम पूर्ण करण्यात आली आहे.
.............
कोणकोणत्या लस दिल्या जातात
-गायी, म्हशींना तोंडखुरी, पायखुरीसोबतच एकटांग्या आणि घटसर्पाची लस दिली जाते.
-शेळ्या, मेंढ्यांना पीपीआर आणि अँटरोटाॅक्सिमिया या रोगासोबत कुक्कुटांना लासोटा, राणीखेत डिसीज, फाऊल पाॅक्स
- कुत्र्यांना अँटिरेबीज लस दिली जाते.
........
नोव्हेंबरचे लसीकरण झाले, पावसाळ्यापूर्वीचे लसीकरण लांबणीवर
गोंदिया जिल्ह्यात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची ४९ पदे मंजूर असून, यापैकी १३ पशुधन वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. दरवर्षी पशुवैद्यकीय दवाखान्यातर्फे लहान जनावरांना दवाखान्यात व मोठ्या जनावरांना पशुपालकांच्या घरी जाऊन ही लस देण्यात येते. अपुऱ्या मनुष्यबळातही गोंदिया जिल्ह्यात काम केले जाते.
..............
लसीकरणासाठी सहकार्य करा
पशुधनाचे नुकसान टाळण्यासाठी पशुपालकांनी ठराविक वेळेत लसीकरण करून सहकार्य करावे. पावसाळ्यात लाळ्याखुरकत हा विषाणूजन्य आजार आहे. यामुळे जनावरे बाधित होण्याचे प्रमाण ९० ते ९५ टक्के असते. रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही याची वेळीच काळजी घ्या.
-डॉ. कांतीलाल पटले
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, गोंदिया.
........
पशुपालक म्हणतात...
दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर तोंडखुरी, पायखुरी, एकटांग्या व घटसर्प आजार जनावरांमध्ये पाहायला मिळतो. मात्र, योग्य वेळी लसीकरण झाले तर जनावरांना रोगाची लागण होत नाही. यंदाचे लसीकरण अद्याप झाले नाही.
-नालकंठ भुते, पशुपालक शिवणीस ता. आमगाव.
............
नोव्हेंबर महिन्यात जनावरांचे लसीकरण केले होते. त्यामुळे कुठल्याही आजाराची लक्षणे जनावरांमध्ये आढळली नाहीत. पावसाळ्यापूर्वीचे लसीकरण आतापर्यंत झाले नाही. जून महिन्यात हे लसीकरण होणार असे पशुसंवर्धन विभागाने सांगितले आहे.
-अशोक गायधने, पशुपालक शिवणी
..........................
जिल्ह्यातील जनावराची एकूण आकडेवारी
शेळ्या - १५५५६६
मेंढ्या - २५७९
कुक्कुट - ५८१२४९
गायी - ३३७५९३
म्हशी - ८८०५३