लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : केंद्र सरकारने १ मार्चपासून ६० वर्षांवरील आणि गंभीर आजाराच्या ४५ वर्षांवरील रुग्णांना लसीकरण करण्याची मोहीम सुरू केली आहे. यासाठी सरकारी रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांचा सुद्धा सहभाग वाढविण्यात आला. याअंतर्गत जिल्ह्यातील १० सरकारी रुग्णालयांत फ्री आणि तीन खासगी रुग्णालयांत २५० रुपयांत लस उपलब्ध करून दिली जाणार आहे. सोमवारी पहिल्याच दिवशी गोंदिया जिल्ह्यातील एकाही खासगी रुग्णालयात लस देण्यात आली नाही. सहा सरकारी रुग्णालयांमध्ये १६५ ज्येष्ठांना लस देण्यात आली.६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना यासाठी ‘को-विन’ आणि ‘आरोग्य सेतू’ ॲपवर नोंदणी करावी लागते. या ॲपवर नोंदणी झालेल्यांना सरकारी रुग्णालयात मोफत लसीकरण केले जाते. या ॲपची साईडच सुरू हाेत नसल्याने नोंदणी करताना फारच अडचणी येत होत्या. खासगी रुग्णालयातील डॉक्टरांना या लसीसंदर्भात प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी जिल्ह्यातील एकाही खासगी रुग्णालयातून लस दिली नाही.
सुरुवातीला ॲपची अडचण होती. परंतु आता काहीच अडचण नाही. ६० वर्षांवरील लोकांनी ऑनलाइन रजिस्ट्रेशन स्वत: करून घ्यावे. जेणेकरून लसीकरण करणे सोईचे होईल. तीन खासगी हॉस्पिटलला लसीकरण करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे तिथे लसीकरण सुरु होईल.- डॉ. नितीन कापसे, जिल्हा आरोग्य अधिकारी, गोंदिया.
पहिल्या दिवशी जिल्ह्यातील सात रुग्णालयांत लस देण्यात आली. यात तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात ५१, बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात २९, केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात ४६, ग्रामीण रुग्णालय अर्जुनी-मोर ४, ग्रामीण रुग्णालय आमगाव २७, ग्रामीण रुग्णालय गोरेगाव ८ अशा १६५ लोकांना लसीकरण करण्यात आले. त्यात पुरुष ९१ तर महिला ७४ लसीकरण करण्यात आले. पहिल्याच दिवशी लसीकरण मोहीमे दरम्यान कुठलाही गोंधळ उडू नये यासाठी केवळ सहा लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले. मात्र हळूहळू लसीकरण केंद्राची संख्या वाढविण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.