तपास अपूर्णच : ११ महिन्यांपासून आरोपींचा हजेरी लावा कार्यक्रमआमगाव : पद्मपूर येथील गाजलेल्या बोगस रजिस्ट्रीप्रकरणी अखेर पोलिसांनी १० महिन्यांनंतर या प्रकरणात साक्षीदार असलेल्या एका वकीलाला अटक केली आहे. मुकेश पुरूषोत्तम जांगळे (रा. आमगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या सात झाली आहे.पद्मपूर येथील सोनकाबाई बघाडे या वृध्द महिलेची मालकीची ७ आर जमीनपैकी ५ आर जमीन तीच्या मृत्युनंतर बनावट महिलेला समोर करून खोट्या रहिवासी प्रमाणपत्राच्या आधारे जमीनीची विक्री करण्यात आली. परंतु याचे बिंग फुटताच आरोपींनी राजकीय दडपणाखाली स्वत:चे बचाव करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. परंतु हे प्रकरण डोईजड होत असल्याचे पाहून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आतापर्यंत पदमपूर येथील बोगस रजिस्ट्री प्रकरणात अटक झालेल्या आरोपींची संख्या सात झाली आहे.पद्मपूर येथील ७ आर जमीन मालक मृतक सोनकाबाई बघाडे मुख्यत: तालुक्याच्या सावंगी येथील रहिवासी होत्या. त्यांचे संपुर्ण कुटुंबच सावंगी येथे वास्तव्यास आहे. त्यामुळे पद्मपुर येथील जमिनीकडे त्यांचा रखरखाव कमी होता. आरोपींनी याचा लाभ घेत सोनकाबाई बघाडे यांच्या मृत्यूनंतरही तीला जीवंत दाखवून तीच्या ठिकाणी बनावटगीरी समोर करून दुसऱ्या कौशल मंगरू शेंदरे या वृध्द महिलेला सोनकाबाई दर्शवून तीला पद्मपुर येथील रहिवासी दाखवून खोटे प्रमाणपत्र बनविण्यात आले होते. या प्रमाणपत्राला सरपंच व सचिवांनी साक्षांकीत केल्याचे प्रमाण करून त्याला तहसील येथे शपथपत्र करण्यात आले. त्यामुळे मृत्यू झाल्यानंतरही त्या महिलेला जीवंत दाखवून बोगस रजिस्ट्री तयार करण्यात आली. याचे बिंग फुटल्याने २ सप्टेंबरला पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली. तक्रारीची दखल घेऊन पोलीस विभागाने तब्बल एक महिन्यानंतर २ आॅक्टोबर २०१३ रोजी गुन्हा नोंदवून आरोपी मनोज सुखदेव शेंदरे (१९) याला ३ सप्टेंबरला अटक करण्यात केली. खेमराज कोदु हुकरे याला २ आॅक्टोबर, नरेंद्र ग्यानीराम डोये ४ आॅक्टोबर व कौशल मंगरू शेंदरे या महिलेला ५ आॅक्टोबरला, या प्रकरणातील आरोपी सरपंच सरपंच सीता पांडुरंग पाथोडे व सचिव योगलाल देवाजी पुंड यांनी जिल्हा सत्र न्यायालयातून अटकपुर्व जामीन घेतला. परंतु हे प्रकरण न्यायालयात न गेल्यामुळे आरोपी सरपंच सीता पांडुरंग पाथोडे व सचिवाला मागील ११ महिन्यांपासून दर रविवारी आमगावच्या पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागत आहे. या प्रकरणाचे मूळ कागदपत्र पोलिसांनी जप्त केले. या प्रकरणातील आरोपींवर भादंवि कलम ४२०, ४६८, ४७१, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणात अटक करण्यात आलेला मुकेश पुरूषोत्तम जांगळे हा सातवा आरोपी असल्याची माहिती तपास करणारे पोलीस हवालदार निलू बैस यांनी दिली आहे. (शहर प्रतिनिधी)
बोगस रजिस्ट्री प्रकरणात वकिलाला अटक
By admin | Published: August 17, 2014 11:15 PM