सडक-अर्जुनी : स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्याने भरधाव ओमनी व्हॅन रस्त्याच्या कडेला असलेल्या पळसाच्या झाडाला आदळली. त्यानंतर व्हॅनने क्षणात पेट घेतला. यात चालकाचा जळून मृत्यू झाला, तर तीनजण जखमी झाले. ही घटना खोडशिवनी-सौंदड रस्त्यावरील सिंदीपारजवळ गुरुवारी सायंकाळी साडेसहाच्यासुमारास घडली. मुन्ना वडकू कांबळे (वय ४०, रा. परसोडी, सौंदड) असे मृताचे नाव आहे, तर रामकृष्ण सोमा कांबळे, देवराम सोनू कांबळे व सुभाष शिवा कांबळे ( सर्व रा. परसोडी, सौंदड) अशी जखमींची नावे आहेत.
बहिणीची प्रकृती बरी नसल्यामुळे तिच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी रामकृष्ण कांबळे, देवराम कांबळे, सुभाष कांबळे व मुन्ना कांबळे हे मारुती ओमनी व्हॅनने (एमएच ३५-ई ४२१) गोरेगाव तालुक्याच्या बागळबंद (कुऱ्हाडी) येथे गुरुवारी सकाळी ११ च्या सुमारास गेले होते. बहिणीच्या प्रकृतीची विचारपूस केल्यानंतर ते लगेच त्याचदिवशी परसोडी येथे परत येत होते. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास खोडशिवनी ते सौंदड मार्गावरील सिंदीपारजवळ भरधाव असलेल्या व्हॅनच्या स्टेअरिंगवरील चालक मुन्ना कांबळे यांचे संतुलन सुटले. त्यामुळे व्हॅन रस्त्याच्या बाजूला असलेल्या पळसाच्या झाडाला आदळली. त्यानंतर क्षणात या व्हॅनने पेट घेतला. यात चालक मुन्ना कांबळे यांचा जळून मृत्यू झाला, तर रामकृष्ण कांबळे, देवराम कांबळे व सुभाष कांबळे हे जखमी झाले. या घटनेची नोंद डुग्गीपार पोलिसांनी केली आहे. पुढील तपास ठाणेदार सचिन बांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रवी चौधरी व पोलीस नायक दहीवले करीत आहेत.