गोंदिया : ‘वंदे भारत’ या हायस्पीड रेल्वे गाडीची देखभाल-दुरुस्ती वेगवेगळ्या ठिकाणी करण्याचे नियोजन रेल्वे विभागाने केले आहे. गोंदिया आणि बिलासपूर येथे या गाड्यांची देखभाल-दुरुस्ती केली जाणार असून यासाठी स्वतंत्र डेपो तयार करण्यात येणार आहे. यात केवळ ‘वंदे भारत’ रेल्वे गाड्यांचीच देखभाल- दुरुस्ती केली जाणार आहे. यामुळे गोंदिया रेल्वे स्थानकाचे महत्त्व वाढणार आहे.
‘वंदे भारत’ या हायस्पीड रेल्वेची नुकतीच सुरुवात करण्यात आली. या रेल्वेचे वैशिष्ट्य म्हणजे ती ताशी १६० ते १८० किमी वेगाने धावते. त्यासाठी या गाडीत काही तांत्रिक बदल करण्यात आले आहेत. गाडीतील बैठक व्यवस्थासुद्धा थोडी वेगळी आहे. टप्प्याटप्प्याने या रेल्वे गाड्या विविध मार्गांवर सुरू करण्यात येणार आहेत. या गाड्यांची देखभाल-दुरुस्ती करण्यासाठी गोंदिया आणि बिलासपूर या दोन ठिकाणांची निवड करण्यात आली आहे. या गाड्यांचे डेपो हे स्वतंत्र असणार असून त्यासाठी प्रत्येकी ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. दोन्ही ठिकाणी कामाला सुरुवात करण्यात आली आहे. पुढील वर्षी मे-जून महिन्यात या डेपोचे काम पूर्ण केले जाईल. त्यानंतर पहिल्या टप्प्यात गोंदिया-दुर्ग तसेच दुर्गवरून रायपूर मार्गे बिलासपूरवरून झारसगुडा येथे जाईल. तर दुसरी गाडी बिलासपूरहून संपर्क क्रांतीमार्गे दिल्ली येथे पोहाेचेल.
मोजक्याच रेल्वे स्थानकांवर थांबे
रेल्वेच्या सीआरएमएस चमूने दुर्ग ते झारसगुडा या मार्गावर ताशी १३० किमी वेगाने गाडीची ट्रायल घेतली. हे ट्रायल ‘वंदे भारत’साठी नसले तरी या मार्गावर ही सुरू करण्यास कुठलीच अडचण नसल्याचे रेल्वेच्या तांत्रिक विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे रेल्वे बोर्डाकडून मंजुरी मिळाल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. विशेष म्हणजे, या गाडीला थांबादेखील काही निवडक रेल्वे स्थानकांवर असणार आहेत.
असे आहे पहिल्या टप्प्यातील नियोजन
पहिल्या टप्प्यात ही रेल्वे बिलासपूरहून संपर्क क्रांतीमार्गे दिल्लीला जाईल. तर दुसरी गाडी गोंदिया- रायपूर- बिलासपूर मार्गे झारसगुडा येथे जाईल. यामुळे या मार्गावरील प्रवाशांना सोयीचे होणार आहे.
बिलासपूर ते दिल्ली १४ तासांत
सध्या बिलासपूर ते दिल्ली हे अंतर गाठण्यासाठी इतर रेल्वेने १८ तास लागतात. मात्र, ‘वंदे भारत’ रेल्वेने हे अंतर १४ तासांत गाठणे शक्य होणार आहे. तर गोंदियाहून ‘वंदे भारत’ गाडी सुरू झाल्यावर रायपूरहून झारसगुडा येथे पोहाेचण्यासाठी चार तास लागणार आहेत.