३ ते १० आॅक्टोबरपर्यंत : केटीएस रुग्णालयात मार्गदर्शन व चर्चासत्र गोंदिया : सुदृढ मानसिक आरोग्य म्हणजे आयुष्यात येणाऱ्या सगळ्या बऱ्यावाईट अनुभवांना खंबीरपणे सामोरे जाणे. कुटुंब आणि समाजातील इतर लोकांशी चांगले नाते असणे, असा अर्थ आहे. तरी प्रत्येकाच्या आयुष्यात चढउतार नेहमी असतेच. जेव्हा आयुष्याचा प्रवास खडतर होतो, कधीतरी अशावेळी नेमके काय करावे, कुणाला सांगावे हे प्रश्न आपल्याला भेडसावू शकतात. दैनंदिन जीवनातील ताणतणाव, परीक्षेतील अपयश, व्यावसायिक अपयश, शेतीतील नुकसान, कर्जबाजारीपणा, प्रेमभंग, तीव्र नैराश्य किंवा तीव्र मानसिक आजार, व्यसनाधिनता, व्यक्तिमत्व दोष अशा अनेक कारणांमुळे व्यक्तीला मानसीक आजार होऊ शकतात. जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर व मनोविकृती तज्ज्ञ डॉ. आनंद लाडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात जागतिक मानसिक आरोग्य सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. त्या अनुषंगाने ३ आॅक्टोबर रोजी केटीएस सामान्य रुग्णालयाते जागतिक मानसिक आरोग्य दिन, सप्ताहाचे उद्घाटन व मानसिक आजाराबद्दल जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले. ४ आॅक्टोबरला ग्रामीण रुग्णालय आमगाव येथे मानसिक आरोग्याबद्दल जनजागृती कार्यक्रम पार पडले. ५ आॅक्टोबरला केटीएस सामान्य रुग्णालयात मानसिक आजाराबद्दल मतीमंद विद्यार्थ्यांच्या पालकांना मार्गदर्शन व चर्चासत्र घेण्यात आले.आता सोमवारी १० आॅक्टोबरला केटीएस सामान्य रुग्णालयात ताणतणावमुक्त आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. तालुका व गावस्तरावर आत्महत्येच्या विचारांनी ग्रस्त रुग्णांना या शिबिरामध्ये योग्य उपचार व मार्गदर्शन मिळणार आहे. त्यामुळे ते ताणतणावमुक्त राहू शकतात. या शिबिरामध्ये डॉ. आनंद लाडे, डॉ. यामिनी येळणे, अमित वागदे, दीपक थाटे, मीना रेवतकर, वैशाली थुल, दीपक आगुलवार, मयूर कांबळे उपस्थित राहणार आहेत. रूग्णांनी मोठ्या संख्येने सदर शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संगीता भिसे होत्या. व्यासपीठावर डॉ. आनंद लाडे उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. लाडे यांनी मांडले. संचालन दीपक थाटे यांनी केले. आभार मयूूर कांबळे यांनी मानले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर यांनी, मनात आत्महत्येचे विचार येत असलेल्या रुग्णांनी किंवा महाराष्ट्र शासनाची टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक १०४ वर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. (प्रतिनिधी)
जागतिक मानसिक आरोग्य सप्ताहात विविध उपक्रम
By admin | Published: October 06, 2016 1:05 AM